भाईंदर: टोरेस कंपनीत गुंतवणूक केलेल्या एका व्यक्तीला हिरा देण्यात आला होता. या हिऱ्याची किंमत ५०० रुपये इतकीच निघाली आहे. टोरेस कंपनीच्या घोटाळ्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
मीरा-रोड, भाईंदरसह मुंबईतील ‘टोरेस’च्या सर्व शाखा सोमवारी अचानकच बंद झाल्यामुळे ग्राहकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. दागिने विक्रीबरोबरच गुंतवणुकीचाही व्यवसाय करणाऱ्या या कंपनीकडून ग्राहकांना गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आमिषं दाखवण्यात आली होती. त्यातलंच एक आमिष म्हणजे गुंतवणुकीवर आठवड्याला ११ टक्के व्याज परतावा मिळणार. पण सोमवारी अचानक कंपनीच्या सगळ्याच शाखा बंद दिसल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या व्यथा मांडायला सुरुवात केली.
“शेअर मार्केटमध्येही गुंतवणूक केल्यानंतर मिळालेल्या परतव्यातून टोरेस कंपनीत गुंतवणूक केली. सुरुवातीला चांगला नफा मिळाल्यानंतर मित्रांनाही यात गुंतवणूक करण्यास सांगितले. माझ्यामुळे त्यांची फसवणूक झाल्यामुळे अपराधीपणाची जाणीव होत आहे. यामुळे जिवलग मित्र गमावण्याची वेळ आली आहे”, अशा शब्दांत गुंतवणूकदारांनी आपली व्यथा मांडली आहे.
“मी या योजनेत पाच लाख रुपये गुंतवले आहेत. पण आता दुकान बंद आहे. नेमकं काय झालंय ते माहिती नाही. पण आम्हाला आमचे पैसे परत हवेत. त्यांनी आधी सांगितलं की पैशांच्या बदल्यात एक स्टोन दिला जाईल. त्यानंतर त्यांनी सांगितलं की जेवढे पैसे गुंतवले त्यावर व्याजापोटी आठवड्याला ११ टक्के पैसे दिले जातील. आज माझा पहिला हप्ता येणार होता”, अशी तक्रार आणखी काही गुंतवणूकदारांनी मांडली.
‘टोरेस’ नावाच्या सोने, चांदी, हिरे यांचे व्यवहार करणाऱ्या कंपनीने ३ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबईत कार्यालय सुरू केलं. गुंतवणुकीचाही व्यवसाय सुरू केला. दागिन्यांची विक्री केल्यास गुंतवणुकीवर ४ टक्के व्याज देण्याचं कबूल केलं. नंतर ही रक्कम वाढवून ६ टक्के केली. काही दिवसांपूर्वीच ११ टक्के व्याज परतावा देण्याचं कंपनीनं जाहीर केलं. ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतवण्यात आला. सुरुवातीच्या काळात सांगितल्याप्रमाणे व्याज परतावा दिला. पण सोमवारी अचाकन सर्वच कार्यालयं बंद असल्यामुळे ग्राहकांमध्ये घबराट पसरली. काही कार्यालयांबाहेर ग्राहकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. मोडतोडीचेही काही प्रकार घडले. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी बंदोबस्त तैनात केला.
या कंपनीत गुंतवणूक केलेल्या एका व्यक्तीला सिक्युरिटीसाठी हिरा दिला होता. या हिऱ्याची किंमत ५०० रुपये इतकीच निघाली आहे. या टोरेस कंपनीच्या गुंतवणूकादारांचे टेन्शन वाढले आहे. टोरेस कंपनी ही 12 महिन्यांपासून सुरु आहे. या कंपनीने भरलेल्या रकमेच्या दहा टक्के पैसे दर आठवड्याला मिळणार असल्याचे आश्वासन दिले होते. गेल्या महिन्यापर्यंत अनेक नागरिकांना याची परतफेड देण्यात आली होती. या भरलेल्या रकमेच्या सिक्युरिटीसाठी त्यांना डायमंड हिरा देण्यात आलेला होता. परंतु हा डायमंड हिरा देखील खोटा असल्याचे समोर आले आहे. या हिऱ्याची बाजारभाव किंमत 500 रुपये इतकीच आहे. या कंपनीत लोकांनी 10 लाख तसेच जास्तीत जास्त 50 लाखापर्यंत गुंतवणूक केली आहे.
या टोरेस कंपनीच्या विविध भागात शाखा आहेत. या टोरेस कंपनीचं भाईंदर पूर्वच्या रामदेव पार्क परिसरातही कार्यालय आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना अधिक व्याजाचे आमिष दाखवून त्यांच्या आयुष्यभराची कमाईची लूट केली आहे. गुन्हा दाखल होताच या कंपनीच्या प्रमुखांनी पोबारा केल्याची माहिती हाती आली आहे. या कंपनीच्या विरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घोटाळ्यानंतर फसवणुकीच्या गुंतवणूक योजनांपासून दूर राहण्याचं आवाहन पोलिसांनी केली आहे.
मीरा-भाईंदर पोलिसांनी सतर्कता दाखवून कंपनीचे खाते गोठवले आहे. त्यामुळे नागरिकांचे १ कोटी ७७ लाख रुपये वाचवण्यात यश आले आहे.