माजिवडा उड्डाणपुलावर दुभाजकाला कंटेनरची धडक

घोडबंदर मार्गांवर सकाळी पुन्हा वाहतूक कोंडी

ठाणे : माजिवडा उड्डाणपुलाच्या दुभाजकाला कंटेनरने धडक दिल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडला. अपघातानंतर नाशिक-मुंबई महामार्गावरील नाशिकवरुन मुंबईच्या दिशेने येणारी वाहतुकीचा एक तासासाठी खोळंबा झाला.

शहर वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने हटवली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.

ठाण्याच्या माजिवडा उड्डाणपुलाजवळ नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या रोडवर कंटेनर चालक इस्लामउद्दीन यांचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे कंटेनर दुभाजकाला धडकून अपघात झाला. त्यामुळे नाशिक-मुंबई वाहिनीवरील वाहतूक सुमारे एक तास धीम्या गतीने सुरू होती. वाहतूक पोलीस कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांचे मदतीने अपघातग्रस्त कंटेनर हायड्रा मशीन व टोविंग व्हॅनच्या साह्याने रोडच्या एका बाजूला करण्यात आला. मात्र तोपर्यंत मुंबईच्या दिशेने कामासाठी जाणाऱ्या नोकरदारांची वाट अडली. अपघातामुळे रस्त्यावर ऑईल सांडले होते. कंटेनरचे ऑईल रस्त्यावर पसरल्याने मोठी कोंडी झाली होती. या ऑईलवर आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी माती पसरवली. त्यानंतर नाशिक-मुंबई मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत झाला.