टेरेसवरुन श्वान अंगावर पडून चिमुकलीचा मृत्यू

मुंब्र्यातील घटना सीसीटीव्हीत कैद

ठाणे : ठाणे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील एका तीन वर्षीय चिमुकलीच्या अंगावर श्वान पडल्यामुळं तिचा मृत्यू झाला आहे. तर या अपघाताची नोंद मुंब्रा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

मंगळवारी दुपारी मुंब्रा परिसरातील अमृत नगर इथल्या चिराग इमारतीच्या टेरेसवरुन श्वान अंगावर पडल्यानं रस्त्यानं आईसोबत जाणाऱ्या तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या सर्व घटनेचा प्रकार घडला सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद मुंब्रा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मात्र अद्यापही कोणी तक्रार दाखल केली नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली आहे.

अमृत नगर दर्गाहरोड इथं असलेल्या चिराग इमारतीच्या पाचव्या माळ्यावर राहणाऱ्या सय्यद नावाच्या श्वानमालकाच्या हातात श्वान होता. सय्यद हे गॅलरीत उभे असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. दुसरीकडं हे श्वान मालकाच्या हातातून सुटून थेट पाचव्या माळयावरुन खाली असलेल्या तीन वर्षीय चिमुकलीच्या अंगावर पडले. त्यामुळं रस्त्यावरुन जाणारी चिमुकली बेशुद्ध झाली. तर श्वान देखील या अपघातात जखमी झाला आहे. जखमी श्वानाला उपचारासाठी खारघर येथील प्राणी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती स्थानिक प्राणी प्रेमींनी दिली आहे.

बेशुद्ध झालेल्या चिमुकलीला त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या विचित्र अपघात आणि मृत्यू प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मुंब्रा पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

आमच्याकडे अद्याप या प्रकरणी कोणी तक्रार दाखल केली नाही. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यास गुन्हा दाखल करुन पुढील तपास करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली आहे.