मद्यधुंद वाहनचालकांची ३७७ वाहने जप्त
ठाणे: थर्टी फर्स्ट डिसेंबरचे दारू पिऊन सेलिब्रेशन करणे तरुणाईला चांगलेच महागात पडले आहे. वाहतूक विभागाने केलेल्या कारवाईमुळे मद्यपी वाहन चालकांची ३७७ वाहने जप्त करण्यात आली असून त्यांना न्यायालयाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
मद्यपान करून वाहन चालवणे कायद्याने बंदी असून याबाबतचे आवाहन करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाहतूक पोलिसांनी नाकाबंदीत पकडून त्यांच्यावर ही कारवाई केली. तर महिन्याभरात 1326 जणांवर ड्रॅन्क अँड ड्राईव्हची कारवाई झाली.
थर्टी फर्स्ट डिसेंबरच्या रात्री मद्यपान करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढते. अशा तळीरामांकडून वाहन चालवताना अपघात होऊ नये याकरिता वाहतूक विभागाकडून जनजागृती करण्यात येते. ठाणे वाहतूक विभागाने देखील या प्रकारची जनजागृती करून एक डिसेंबरपासूनच ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई वेगाने सुरू केली होती. त्यामध्ये वाहतूक पोलिसांना तब्बल 1326 मद्यपी आढळून आले. या सर्वांवर न्यायालयाच्या निर्देशानुसार दंडात्मक कारवाई झाली आहे. तर वाहतूक विभागाकडून त्याच दिवशी तळीराम चालवत असलेली वाहने जप्त करण्यात आली. एक डिसेंबर पासून सुरू झालेल्या कारवाईचा वेग 25 डिसेंबर ते 31 डिसेंबरच्या कालावधीत जास्त प्रमाणात वाढवण्यात आला होता. या सात दिवसात वाहतूक पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालवताना ६५४ जणांना ताब्यात घेतले, तर दारू पिणाऱ्याच्या मागे बसणाऱ्या 93 जणांना देखील कारवाईला सामोरे जावे लागले. वाहतूक विभागाने त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली. ड्रंक अँड ड्राईव्हची सर्वाधिक सर्वाधिक कारवाई 31 डिसेंबरच्या रात्री झाली. या एका दिवसात वाहतूक पोलिसांनी मद्यपी चालक आणि वाहन चालकाच्या मागे दारू पिऊन बसणाऱ्या अशा एकूण ३७७ जणांवर कारवाई केली.
३१ डिसेंबर रोजी झालेली कारवाई
ठाणे नगर-१७, नौपाडा-१५, कळवा-१६, मुंब्रा-२६, कोपरी-६, वागळे-२०, कापूरबावडी-१८, कासारवडवली-२७, भिवंडी-१४, नारपोली-४३, कोनगाव-३१, कल्याण-२७, डोंबिवली-१९, कोळसेवाडी-२७, विठ्ठलवाडी-१८, उल्हासनगर-२४,अंबरनाथ-२९
पाच वर्षातील मद्यपी वाहन चालकांवर कारवाई
2020 – 2789
2021- 3572
2022 – 2462
2023 – 2333
2024 – 3949
ड्रंक अँड ड्राईव्ह नियमांची अंमलबजावणी व्हावी याकरिता 17 विभागात 45 ठिकाणी नाकाबंदीचे पथक तयार करण्यात आले होते. यामध्ये ३७७ मद्यपींवर कारवाई केली. त्यांची वाहने जप्त करून पुढील कारवाईसाठी त्यांना दुसऱ्या दिवशी न्यायालयात पाठवण्यात आले. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये तरुणांचा मोठा सहभाग आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.