शिवसेना पदाधिकाऱ्याविरुद्ध दिव्यात गुन्हा दाखल

ठाणे: दिव्यात पालिकेचे हॉस्पिटल व्हावे यासाठी शेकडो महिलांनी भाजपच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले होते. या आंदोलनाची खिल्ली उडवून बदनामी करणाऱ्या शिवसेना पदाधिकारी आदेश भगत याच्यावर मुंब्रा पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

भाजपचे मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे व दिवा महिला मोर्चा अध्यक्षा ज्योती पाटील यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.

दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप झालेले असताना फक्त भाजप दिवा मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांच्यावर शिवसेनेचे आदेश भगत यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर भाजपा नेत्यांनी मुंब्रा पोलिसांना जाब विचारला होता. त्यानंतर मुंब्रा पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात भाजपच्या दिवा महिला अध्यक्षा ज्योती पाटील व मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांच्या तक्रारीवरून शिवसेनेचे आदेश भगत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

10 एप्रिलला दिव्यातील शेकडो महिलांनी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या नेतृत्वाखाली ज्योती पाटील यांच्या पुढाकाराने दिव्यात पालिकेचे रुग्णालय व्हावे यासाठी धरणे आंदोलन केले होते. याबाबतच्या बातम्या 11 एप्रिलला प्रसिद्ध झाल्यानंतर त्या दिवा न्यूज या व्हाट्सअप ग्रुपवर भाजपकडून टाकण्यात आल्या. यानंतर लगेचच त्या ग्रुपवर आदेश भगत यांनी भाजपच्या महिलांच्या आंदोलनाची खिल्ली उडवणारा मेसेज दिवा न्यूज या व्हाट्स अप ग्रुप वर टाकला. दिवा मंडळ हे पद ठाणे शहर अंतर्गत येथे मात्र बंटी आणि बबली हे स्वतःला शहराध्यक्ष व महिला अध्यक्ष पद लावतात, कालच्या आंदोलनाकडे नागरिकांनी पाठ फिरवली अशा आशयाचा उल्लेख करून भाजपची व आंदोलनाची बदनामी करण्याच्या उद्देशाने मेसेज फिरवला असे ज्योती पाटील व रोहिदास मुंडे यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात म्हटले आहे.

मी सोशल मीडियावर टाकलेला संदेश जाहीर करावा. भाजप पक्षाचा आणि पदाधिकाऱ्यांच्या नावाचा आणि हॉस्पिटलच्या आंदोलनाचा उल्लेख नसताना पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे. खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे शिवसेनेचे दिवा उप शहर प्रमुख ॲड.आदेश भगत यांनी सांगितले.