जेसीबीने जमीन मालकाचे कार्यालय फोडले
भिवंडी : शहरातील नारपोली भागात जमीन मालकाचे कार्यालय जेसीबीच्या साहाय्याने तोडणाऱ्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सोनीबाई कंपाऊंड येथे राहणारे शिवकांत पांडे यांनी नारपोली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचे मामा प्रवीणचंद पांडे यांनी त्यांची पत्नी प्रमिला पांडे आणि शीला त्रिपाठी यांच्या नावे नारपोली परिसरात ११ गुंठे जमीन २५ ऑक्टोबर २०२३ रोजी खरेदी केली होती. त्या जमिनीवर कार्यालय सुरू करण्यासाठी जमीन मालकांनी ५ जानेवारी २०२४ रोजी रात्री ८.३० वाजता तयार कंटेनर केबिन आणून ठेवली. त्या ठिकाणी आरोपी पाच जण आले आणि त्यांनी पाच लाख रुपये दे नाहीतर कार्यालय उघडू देणार नाही, अशी धमकी देण्यास सुरुवात केली. त्यानंतर ७ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता शिवकांत पांडे हे मामासमवेत येऊन कंटेनरच्या केबिनला रंगरंगोटी करत होते. त्यावेळी पाच जणांनी त्या ठिकाणी येऊन कार्यालय सुरू करण्यास विरोध केला. काही वेळातच राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विकास पाटील हे त्यांच्या सहकाऱ्यांसह जेसीबी घेऊन आले. त्यांनी दोघांना शिवीगाळ करत जेसीबीने कंटेनरची केबिन फोडली.
घाबरलेले मालक आणि त्यांच्या नातेवाईकांनी नारपोली पोलिस ठाणे गाठून भिवंडी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विकास पाटील, वीरेंद्र पाटील, निखिल पाटील, रोहन पाटील, जतीन पाटील, वैभव पाटील, बंटी साळुंखे, दिनेश भोईर आणि जेसीबीचा चालक अशा नऊ जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दाखल तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. परंतु माजी नगरसेवकाचा राजकीय प्रभाव आणि राजकीय दबावामुळे पोलीस आरोपींना अटक करत नसल्याचा आरोप फिर्यादी जमीन मालक शिवकांत पांडे यांनी केला आहे.