उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात रुग्णोपचार मेणबत्तीच्या उजेडात

* शुक्रवारी वीज खंडित, जनरेटर बंद
* रुग्णालय पाच तास अंधारात

ठाणे: उल्हासनगर शहरात नियोजित विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. दुर्दैवाने येथील लाखो नागरिकांचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मध्यवर्ती रुग्णालयात मात्र कधी कधी पाच पाच तास मेणबत्तीच्या उजेडात रुग्णांवर उपचार करण्याची पाळी येते. शुक्रवारी एकीकडे वीज खंडित झाली तर दुसरीकडे जनरेटर पुरेसे नसल्याने डॉक्टर आणि रुग्णांना अंधारात चाचपडण्याची वेळ आली.

या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मनोहर बनसोडे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, महावितरणचे शटडाऊन आणि काही जनरेटरच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने रुग्णालयातील ठराविक भाग हा अंधारात होता. मात्र महत्वाच्या वॉर्डात मोजकेच जनरेटर असल्याने त्या ठिकाणी उजेडात कामकाज झाले. इमर्जन्सी ऑपरेशनची वेळ आल्यास रुग्णाला कॅम्प नंबर 4 मधील शासकीय रुग्णालयात नेऊन ऑपरेशन करण्याची तयारी ठेवण्यात आली होती, अशी माहिती डॉ. बनसोडे यांनी दिली.

शुक्रवारी महावितरणकडून शटडाऊन घेतला जातो. त्यामुळे यापूर्वी देखील रुग्णालय अंधारात गेल्याच्या घटना घडल्या आहेत. चार महिन्यांपूर्वी देखील रुग्णालयात तब्बल दोन दिवस वीज पुरवठा खंडित झाला होता. तेव्हा सुद्धा रुग्णांचे असेच हाल झाले होते. वारंवार जिल्हा रुग्णालयात वीज जात असल्याने त्यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.