उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आरोग्य सेवांचा शुभारंभ ठाण्यात किमोथेरपी सेंटर
ठाणे: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ठाणे शहरासह सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि वर्धा जिल्ह्यात डे-केअर किमोथेरपी सेंटर उभारण्यात येणार असून ठाणे-पालघर जिल्ह्यासह राज्याची आरोग्य यंत्रणा बळकट आणि वेगवान करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
कर्करोग मोबाईल व्हॅन-8, 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिका-384, सीटी स्कॅन-2, ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका-7, डिजिटल हँड हेड एक्स-रे मशिन-80 चा लोकार्पण सोहळा जिल्हा नियोजन भवन सभागृह, येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते श्री.शिंदे बोलत होते.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” राज्यात 700 पेक्षा जास्त ठिकाणी कार्यरत आहे. महिलांचे कुटुंबाच्या आरोग्याकडे पूर्ण लक्ष असते, परंतु स्वतःच्या आरोग्याकडे काहीही लक्ष नसते. आज लोकार्पण केलेल्या या मोबाईल आरोग्य तपासणी यामुळे प्रत्येक गावागावातील महिलांची आरोग्य तपासणी करणे सहज साध्य होणार आहे. कॅन्सर संपविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे श्री.शिंदे म्हणाले.
माझ्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून जवळपास 51 हजार रुग्णांचे प्राण वाचवू शकलो. तब्बल 460 कोटी रुपयांचे सहाय्य आपण गरजू रुग्णांना करू शकलो, यापेक्षा मोठे समाधान नाही, असे सांगून श्री. शिंदे म्हणाले की, हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. त्यांच्या आयुष्यात बदल घडविणे, हेच या शासनाचे ध्येय आहे. समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजना सुरू केल्या, रखडलेले प्रकल्प मार्गी लावले. सर्वसामान्यांचे हे शासन असेच जोमाने काम करीत राहील. लवकरच “उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष” सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही श्री.शिंदे यांनी यावेळी केली.
कॅन्सर, टी.बी., हृदयरोग अशा आजारांचे निदान लवकरात लवकर झाल्यास त्यावर उपचार करणे शक्य आहे. त्यामुळे आरोग्य तपासणी या उपक्रमाचा सर्वसामान्य नागरिकांना निश्चित लाभ होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना मदत करण्यात आली आहे. गेल्या आठ वर्षात हृदयाला छिद्र असणाऱ्या 5500 लहान बालकांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या, हीच तर खरी पुण्याई आहे, अशा भावना श्री.शिंदे यांनी व्यक्त केल्या.
महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत आधी दीड लाखापर्यंतची मदत केली जात होती. परंतु आता या शासनाने सरसकट सर्वांसाठी त्याची मर्यादा पाच लाखापर्यंत केली आहे. दुर्गम भागातील जनतेसाठीही हे शासन तत्परतेने काम करण्यास कटिबद्ध आहे.
यावेळी आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सातारा जिल्ह्यातील दरे गावात आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून 70 कोटी निधी खर्चून नॅचरोपॅथी आणि वेलनेस सेंटर त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरील हरबल गार्डन उभारण्यात येईल, अशी घोषणा केली. तसेच आयुर्वेदाचे महत्व प्रत्येक भारतीयाला कळण्यासाठी “हर घर आयुर्वेद” या उपक्रमाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.
यावेळी आयुष मंत्रालय तसेच स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग मंत्री प्रकाश आबिटकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, विधानपरिषदेच्या उपसभापती श्रीमती नीलम गोऱ्हे, आमदार डॉ.बालाजी किणीकर, नगरविकास विभागचे प्रधान सचिव असिम कुमार गुप्ता, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रोहन घुगे, उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव नविन सोना, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई संचालक अमगोथू श्री रंगा नायक, आरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, राष्ट्रीय नागरी अभियानाचे संचालक डॉ.स्वप्नील लाळे, सुप्रसिध्द अभिनेता तथा माजी खासदार गोविंदा, माजी मंत्री विजय शिवतारे आदि मान्यवर उपस्थित होते.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकारातून आजपासून राज्यातील दोन कोटी महिलांची आरोग्य तपासणी होणार असून यामध्ये रक्त तपासण्या, हिमोग्लोबिन, मधुमेह, रक्तदाब, आवश्यकतेनुसार सर्व तपासण्या निदान व उपचार करण्यात येणार आहेत. हा सुरु करण्यात आलेला उपक्रम महाराष्ट्रातील तमाम मायमाऊलींसाठी समर्पित आहे, अशा भावना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी व्यक्त केल्या.