म्हाडा इमारतींचा पुनर्विकास : विकासकांवर गुन्हे दाखल होणार

आमदार संजय केळकर यांची माहिती

ठाणे : वर्तकनगर येथील म्हाडाच्या पाच इमारतींचा पुनर्विकास सुमारे १४ वर्षे रखडला असून विकासकांनी शेकडो कुटुंबांची घोर फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित विकासकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.

वर्तकनगर येथील म्हाडा इमारतींचा पुनर्विकास गेली १४ वर्षे रखडला असून सर्वसामान्य शेकडो कुटुंबांची घोर फसवणूक झाल्याची भावना येथील रहिवाशांनी व्यक्त केली असून याबाबतची तक्रार इमारत क्र.४८,४९,५०,११ आदी इमारतीमधील रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांना भेटून केली होती. याबाबत श्री.केळकर यांनी आज ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन संबंधित विकासकांवर कारवाई करून आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

याबाबत बोलताना श्री.केळकर म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून याबाबत मी पाठपुरावा करत आहे. आज आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. संबंधित विकासक इमारत बांधतही नाहीत आणि, काम सोडतही नाहीत, त्यामुळे गेली अनेक वर्षे येथील कुटुंबे हक्काच्या घरापासून वंचित आहेत. त्यांची घोर फसवणूक या विकासकांनी केली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी आयुक्तांकडे केली. यावर आयुक्तांनी गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगितले, अशी माहिती श्री.केळकर यांनी दिली.

ठाण्यात मागच्या दरवाजाने हुक्का पार्लर सुरू

ठाण्यात तीन वर्षांपासून हुक्का पार्लरमुक्त ठाणे ही चळवळ सुरू असून काही हुक्का पार्लर कायमचे बंद झाले आहेत, पण काही पार्लर आणि परमिट रूम मागच्या दरवाजाने सुरू असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. या बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाऊन हिसका दाखवतील, असा इशाराही त्यांनी दिला. याबाबत पोलिस आयुक्तांची भेट घेतली असून कारवाईची मागणी केली. यावर पोलिस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार ठाणे पोलिस कारवाईसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. याबाबत लवकरच कारवाईची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहितीही श्री.केळकर यांनी दिली.