ठाणे : ठाण्यातील सरस्वती एज्युकेशन सोसायटी, पाचपाखाडी शाळेची विद्यार्थिनी सान्वी ठाणेकर हिने २०२५ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीने शाळा, शिक्षक, पालक आणि संपूर्ण ठाणेकरांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
सान्वीने आपल्या अभ्यासात सातत्य व आत्मविश्वास ठेवत सर्व विषयांत उत्कृष्ट कामगिरी केली. अभ्यासात गती मिळवण्यासाठी तिने ‘नायक ट्युटोरिअल्स’ या नामांकित क्लासची मदत घेतली होती. शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे पाठबळ आणि स्वतःच्या मेहनतीमुळे तिने हे यश मिळवले आहे.
“अभ्यासाचे टेन्शन घेऊन दिवसभर नुसता अभ्यास न करता, आपण आपली आवड आणि छंद देखील जोपासले पाहिजेत. मी स्वतः स्विमिंग आणि नृत्यकलेची आवड जोपासते,” असे सान्वीने सांगितले. तिच्या मते, अभ्यासासोबत समतोल राखणं हे मानसिक ताण कमी करण्यासाठी महत्त्वाचे ठरते. शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकवर्गाने सान्वीच्या यशाचे विशेष कौतुक करत तिला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.