ठाणे जिल्ह्याचा ९५.५७टक्के निकाल
ठाणे : ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा दहावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली असून ९६.६९टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर ९४.५०टक्के मुलगे उत्तीर्ण झाले आहेत. ठाणे जिल्ह्यात एकूण ९५.५७टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान पालघर जिल्ह्याचा निकाल ९५.३८टक्के एवढा लागला आहे. या जिल्ह्यातही मुलीच अव्वल ठरल्या आहेत. जिल्ह्यातील ४८४ शाळांचा निकाल १००टक्के लागला आहे तर दोन शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.
राज्य माध्यमिक विभागाने आज दुपारी दहावीचा निकाल जाहीर केला. या वर्षी जिल्ह्यातील ५८,०६३ मुले आणि ५५,२६५ मुली असे एकूण एक लाख १३,३२८ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५४,८७३ मुले आणि ५३,४३८असे एकूण एक लाख आठ हजार ३११ विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. या परीक्षेत ३६,७६१ विद्यार्थी डिस्टिंक्शनने उत्तीर्ण झाली आहेत. ३६,१७७ विद्यार्थी पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. २६,१९७ विद्यार्थी द्वितीय तर ९,१७६ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
जिल्ह्यात एकूण १२८५ शाळांपैकी ४८४ शाळांतील एकही विद्यार्थी नापास झाला नाही. ५२४ शाळांचा निकाल ९०टक्क्यांपेक्षा जास्त लागला आहे. १६६ शाळांचा निकाल ८०टक्क्यांपेक्षा जास्त लागला आहे. ७० टक्क्यांपेक्षा जास्त निकाल ५३ शाळांचा लागला आहे. ३२ शाळांमधील विद्यार्थी ६०टक्क्यांपेक्षा जास्त उत्तीर्ण झाले आहेत. ५०टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी १६ शाळांमधून उत्तीर्ण झाले आहेत. तीन शाळांचा निकाल ४०टक्क्यांपेक्षा जास्त तर तीन शाळांतील विद्यार्थी ३०टक्क्यांपेक्षा जास्त उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील दोन शाळांचा निकाल शून्य टक्के इतका लागला आहे. या शाळांमधील एकही विद्यार्थी उत्तीर्ण झाला नाही.
पालघर जिल्ह्याचा निकाल ९५.३८टक्के
पालघर जिल्ह्यातून ३३,३५५ मुलगे तर ३०,२६२ मुली असे एकूण ६३,६१७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी ३१,४४८ मुलगे आणि २९,२३२ मुली असे एकूण ६०,६८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेत पालघर जिल्ह्यातून ९४.२८ टक्के मुलगे तर ९६.५९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. जिल्ह्याचा एकूण निकाल ९५.३८ टक्के लागला.