बीसीसीआयच्या उपाध्यक्षांनी दिली महत्त्वाची माहिती
नवी दिल्ली: भारत-पाकिस्तान या दोन्ही देशातील तणाव प्रचंड वाढल्यानंतर आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंच्या सुरक्षेचा हवाला देऊन बीसीसीआयने या संबंधीचा निर्णय घेतला होता. दरम्यान आज (१० मे) संध्याकाळी ५ वाजेपासून दोन्ही देशात शस्त्रविरामावर एकमत झाले आहे. त्यामुळे आयपीएलच्या वेळापत्रकात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्या शस्त्रविराम झाल्यानंतर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आयपीएल स्पर्धेच्या वेळापत्रकाबद्दल अपडेट दिली आहे. वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना शुक्ला म्हणाले की, नवीन घडामोड घडली असून शस्त्रविराम जाहीर करण्यात आले आहे. दोन देशांमधील संघर्ष थांबला आहे. याच पार्श्वभूमीवर आपण आयपील आठवडाभरासाठी पुढे ढकलले होते. आता नवीन परिस्थितीमध्ये बीसीसीआयचे अधिकारी आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल उद्या बैठक घेऊन याबद्दल चर्चा करतील. त्यानंतर आम्ही ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी कोणते वेळापत्रक योग्य असेल याबद्दल निर्णय घेऊ. लवकरच याबद्दल चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही राजीव शुक्ला म्हणाले.
चन्नई, बंगळुरू आणि हैदराबाद या तीन ठिकाणांचा स्पर्धेसाठी विचार केला जात असल्याबद्दल विचारले असता शुक्ला म्हणाले की, संधर्ष सुरू असताना हे पर्याय ठेवण्यात आले होते की दक्षिण भारतात या स्पर्धेचे आयोजन केले जाऊ शकते. तसेच इतरही अनेक पर्यांयांवर चर्चा करण्यात आली होती, पण आताच शस्त्रविराम जाहीर करण्यात आले असल्याने आम्हाला थोडा वेळ द्या, आम्हाला इतर अधिकार्यांशी तसेच आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलशी चर्चा करू द्या आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे शुक्ला म्हणाले.
आयपीएल २०२५ स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यातील पहिल्या डावातील १० षटकं झाल्यानंतर हा सामना थांबवण्यात आला होता. तसेच स्टेडियमच्या लाईट्स बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर प्रेक्षकांना बाहेर जाण्यासाठी सांगण्यात आले. शेवटी हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ही स्पर्धा अनिश्तित काळासाठी स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बीसीसीआयने बैठक घेऊन आयपीएल स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली असल्याची माहिती दिली होती. दरम्यान आता शस्त्रविराम जाहीर केल्यानंतर आयपीएलच्या वेळापत्रकात काही बदल केले जातात का हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.