आर अश्विनला पद्मश्री, पीआर श्रीजेशला पद्मभूषण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव

नवी दिल्ली: सोमवार २८ एप्रिल रोजी राष्ट्रपती भवन येथे झालेल्या शासकीय समारंभात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारताचे माजी क्रिकेटपटू आर अश्विन यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

आर अश्विन यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करत असल्याची घोषणा केली होती. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी बहुमूल्य योगदान दिलं. या योगदानामुळे त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अश्विन यांच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी कसोटी संघाला उंचीवर घेऊन जाण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. यासह त्यांनी २०११ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आणि २०१३ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

आर अश्विन यांच्या कारकि‍र्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यांना भारतीय संघाकडून १०६ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्यांनी ५३७ गडी बाद केले. ते कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. गोलंदाजीसह त्यांनी फलंदाजीतही बहुमूल्य योगदान दिलं आहे. फलंदाजी करताना त्यांनी ६ शतकांसह ३५०३ धावा केल्या आहेत. यासह वनडे क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी १५६ गडी बाद केले आहेत. तर टी-२० क्रिकेटमध्ये त्यांनी ७२ गडी बाद केले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्यानंतर आर अश्विन सध्या आयपीएल २०२५ स्पर्धा खेळण्यात व्यस्त आहेत. आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जने बोली लावून त्यांना आपल्या संघात स्थान दिलं. यापूर्वी २०२४ मध्ये झालेल्या आयपीएल हंगामात ते राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना दिसून आले होते. मात्र आयपीएल २०२४ स्पर्धेनंतर राजस्थान रॉयल्सने त्यांना रिलीज करण्याचा निर्णय घेता होता. आता त्यांना पद्मश्री हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

या स्टार खेळाडूलाही मिळाला पुरस्कार
या समारंभात, भारताच्या हॉकी संघाचे माजी गोलकीपर पीआर श्रीजेश यांचा देखील सन्मान करण्यात आला. श्रीजेश यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. श्रीजेश यांनी भारतीय हॉकी संघासाठी मोलाचं योगदान दिलं आहे. पॅरिसमध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने कांस्यपदकाला गवसणी घातली होती. या स्पर्धेनंतर श्रीजेश यांनी हॉकीमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती. सध्या ते ज्यूनिअर हॉकी संघाला प्रशिक्षण देत आहेत.