ठाण्यातील सहा प्रभागांना मिळाले नवीन सहायक आयुक्त

* वादग्रस्त दिव्यात नागरगोजे तर गिरी यांची कळव्यात बदली

ठाणे: ठाणे महापालिकेतील अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या तीन महिला अधिकाऱ्यांकडील कार्यभार काढून नवीन आलेल्या सहा सहाय्यक आयुक्तांकडे पदभार सोपविण्यात आला आहे.

ठाणे महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदाच्या सुमारे १८ जागा रिक्त होत्या. राज्य सरकारने मागील आठवड्यात सहा अधिकाऱ्यांची ठाणे महापालिकेत बदली केली होती. त्यांच्याकडे आज सहा प्रभाग समितीचा कार्यभार सोपाविण्यात आला. वादग्रस्त दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदी शिवप्रसाद नागरगोजे, वर्तकनगर प्रभात समितीच्या सहाय्यक आयुक्तपदी विजय कावळे, लोकमान्य-सावरकर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदी सोमनाथ बनसोडे, माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदी सोनल काळे यांची नियुक्ती करण्यात आली तर उथळसर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदी भालचंद्र घुगे यांना कायम ठेवण्यात आले आहे. दिवा प्रभात समितीचे राजेंद्र गिरी यांच्याकडे कळवा प्रभाग समितीचा कार्यभार सोपाविण्यात आला आहे.

वर्तकनगर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदी तनुजा रणदिवे, स्मिता सुर्वे यांच्याकडे माजिवडा-मानपाडा आणि ललिता जाधव यांच्याकडे कळवा प्रभाग समितीचा अतिरिक्त कार्यभार सोपाविण्यात आला होता. त्यांच्याकडील कार्यभार आता काढून घेण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.