ठाण्यात ऐन उन्हाळ्यात सब वे बुडाला

* वाहतुक खोळंबली, पाण्याचा निचरा करणारा पंप गायब

ठाणे: ठाणे पूर्व-पश्चिम जोडणारा सिडको थांब्यानजीक चेंदणी कोळीवाड्यातील सब वे (भुयारी मार्ग) भर उन्हाळ्यात बुडाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.

खाडीनजीक हा मार्ग असल्याने खाडीला आलेल्या भरतीने हा सब वे पाण्याखाली गेल्याने दोन्ही बाजुची वाहतुक तब्बल साडेतीन तास खोळंबली होती. खाडीचे पाणी पातळीपेक्षा अधिक वाढल्यामुळे अनेक दुचाकी वाहने बंद पडली. तर पादचाऱ्यांना ये-जा करणेही अवघड बनल्याने नागरीकांचा संपर्कच तुटला होता. दरम्यान, पाण्याचा निचरा करणारा पंपही गायब होता, याबाबत ठाणे मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळवुन देखील बराच काळ कोणतीही उपाययोजना करण्यात न आल्याने संताप व्यक्त केला गेला.

देशातील पहिली रेल्वे धावली त्या ठाणे शहरातील ठाणे ते कळवा रेल्वे मार्गावर असलेल्या रेल्वे पुलाखालून पूर्व व पश्चिमेला येण्या-जाण्यासाठी ब्रिटिशकालीन सबवे सिडको परिसरात उभारण्यात आला आहे. या सबवेला दोन मार्गिका असून त्यातील ठाणे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या मार्गिकेत सोमवारी कंबरेइतके पाणी साचल्याने ही मार्गिकाच ठप्प झाली. तर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या वाहिनीवर देखील पदपथाच्याही वर पाणी तुंबले होते. त्यामुळे येथून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना खाडीच्या सांडपाण्याचा त्रास झाला. पुलाखालील बोगद्यात सांडपाणी प्रमाणापेक्षा अधिक साचल्याने अनेक दुचाकी वाहने बंद पडली. दुसरीकडे हा मार्ग बंद झाल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने अभुतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती. वास्तविक या भुयारी मार्गात नेहमीच पाणी तुंबण्याच्या घटना घडत असल्याने या ठिकाणी मोटर पंप बसवुन पाण्याचा निचरा पुन्हा खाडीत करण्यात येतो. परंतु गेले काही दिवस येथील पंप गायब असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. यासंदर्भात ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे तक्रारी करूनही कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नसल्याचे नागरिकांनी सांगितले.