उल्हासनगर : महाराष्ट्रात राबवण्यात येणाऱ्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यात उल्हासनगर महानगरपालिकेने 29 महानगपालिकांत पहिल्या सहामध्ये झेप घेतली आहे. शहराला लाभलेल्या पहिल्या महिला आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी पालिकेच्या अंतर्गत व बाह्य परिसरांचा कायापालट करून दाखवल्याने महानगरपालिकेने प्रथम तीनमध्ये येण्यासाठी कंबर कसली आहे.
कृती आराखड्याच्या केंद्र समितीचे स्नेहल कुलकर्णी, डॉ. अतुल कोचर, आनंददिप गुप्ता यांनी शुक्रवारी महानगरपालिकेत भेट देऊन सर्व्हेक्षण केले असून रात्री उशिरापर्यंत आढावा घेतला आहे. आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशान्वये पालिका अधिकाऱ्यांची केंद्राच्या समितीसोबत स्थायी समिती सभागृहात बैठक झाली. त्यात शहरातील विकासकामे, प्रगतीपथावरील योजना आणि पालिकेचा करण्यात आलेला कायापालट हा प्रोजेक्टरवर सादर केल्यावर केंद्राची टीम प्रभावित झाली आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, सहायक संचालक नगररचना ललित खोब्रागडे, मुख्यलेखा अधिकारी किरण भिलारे, मुख्यलेखा परीक्षक शरद देशमुख, उपआयुक्त विशाखा मोटघरे, दिपाली चौगले, अनंत जवादवार, जनसंपर्क अधिकारी अजय साबळे, सचिव प्राजक्ता कुलकर्णी, कर निर्धारक व संकलक निलम कदम, शहर अभियंता हनुमंत खरात आदींसह सहायक आयुक्त, विभागप्रमुख उपस्थित होते.
कृती आराखड्या अंतर्गत शहरात 4 शाळा आणि 5 रस्ते आदर्श करण्यात येत आहेत. हे काम प्रगतीपथावर सुरू आहे.महानगरपालिकेत येणाऱ्या अभ्यागतांसाठी व्हिजिटर्स मॅनेजमेंट सिस्टीम ऍप लावण्यात आल्याने त्यांची फोटोसह डिजिटल एन्ट्री होणार आहे. त्यांच्यासाठी बसण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. नगरपरिषद असल्यापासूनच्या कागदपत्रांचे वर्गीकरण करण्यात आल्याने लेखा विभाग, मालमत्ता कर विभाग,नगररचना विभाग आदींच्या कार्यालयांना कॉर्पोरेट लुक मिळाला आहे.पालिकेच्या भिंतीवर शहरातील विकास व ऐतिहासिक मंदिरे आदींचे चित्र लावण्यात आल्याने येणारे नागरिक कौतुक करून जाऊ लागले आहेत. मराठीतील दिशादर्शक फलक व 303 दालनांचे नंबर लक्षवेधक दिसू लागले आहेत. सहायक संचालक नगररचना ललित खोब्रागडे यांनी नगररचना विभागाचा तसेच कर निर्धारक व संकलक निलम कदम यांनी मालमत्ता कर विभागाचा प्रथमदर्शनी भाग मोठ्या बोर्डने झळकावून टाकला आहे. महापालिकेच्या चौकाला स्मार्ट लुक देण्यात आला आहे.
आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशान्वये तसेच मार्गदर्शनाखाली सर्व अधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी पार पाडून काम केल्याचे हे सकारात्मक पडसाद उमटले असल्याचे अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांनी सांगितले.