कल्याण : लहान मुलांचा हाताचा स्पर्श त्यांच्या बंदिवान आईच्या हाताला होताच दोघांच्याही डोळ्यातून वाहणारे अश्रू मुलांप्रती असलेली माया, आपुलकी, जिव्हाळा यातून आई आणि मुलाचे नाते कल्याण जिल्हा कारागृहात पाहायला मिळाले.
कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक सुहास वारके, विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या प्रेरणेतून कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण जिल्हा कारागृहात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला बंद्यांकरिता ‘गळाभेट’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी, महिला बंदी व त्यांची मुले भारावून गेली होती.
कारागृहातील महिला बंदांची लहान मुले जी बाहेरील संस्थेत अथवा पालकांजवळ आहेत अशा १८ वर्षांखालील १४ मुले व ९ मुली यांच्याकरीता कल्याण जिल्हा कारागृह प्रशासन व टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स प्रयास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी ‘गळाभेट’ कार्यक्रम पार पडला. गेल्या १० वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील सर्व कारागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
बंद्यांचे नातेवाइक प्रत्यक्ष भेट घेऊन, ई-मुलाखत तथा स्मार्ट फोनच्या माध्यमातून बंद्यांशी संवाद साधतात. मात्र, या कार्यक्रमाद्वारे बंदी व नातेवाईक मुले, नात, नातू समोरासमोर बसून एकमेकांसोबत हितगुज केले. कल्याण जिल्हा कारागृह प्रशासन व प्रयास या संस्थेने महिला बंदांच्या मुलांना प्रशासनामार्फत चॉकलेट, नाश्ता, पोहे तर प्रयास संस्थेने फळे दिली.
गळाभेट कार्यक्रमामुळे महिला बंद्यांमध्ये जगण्याची नवी उमेद निर्माण झाली आहे. कुटुंबात परत जाण्यास, मुलांचा सांभाळ करण्यास सकारात्मक प्रतिसाद त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला असल्याची प्रतिक्रिया कल्याण जिल्हा कारागृहाचे अधीक्षक पी. जे. जगताप यांनी दिली.