* टोईंग व्यवस्था पुन्हा बंद करण्याची वाहतूक शाखेवर नामुष्की
* संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
ठाणे: निविदा न काढताच बेकायदेशीरपणे ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात वाहतूक पोलिसांमार्फत सुरु असलेली टोईंग व्यवस्था बंद करण्यात आल्यानंतर दोन दिवसांपूर्वी ती पुन्हा एकदा सुरु करण्यात आली. त्यास एका सामाजिक कार्यकर्त्याने हरकत घेताच पुन्हा ती बंद करण्यात आली. बेकायदेशीरपणे ही व्यवस्था पुन्हा सुरु झाली तर न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचा इशारा ठाणेकरांनी दिला आहे.
वाहतूक पोलीस रस्त्यावर नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या विरोधात कारवाई करत होते. त्याचा सर्वसामान्य ठाणेकरांना प्रचंड मनस्ताप होत होता. ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्याबरोबर वाहन उचलणारे कामगार बेशिस्त वर्तन करत असत. त्यामुळे अनेकदा ठाणेकर आणि टोईंगवरील कर्मचारी यांच्यात वाद होत होता, तसेच वाहतूक पोलीस अवाच्या सव्वा दंड आकारणी करून त्यांचे खिसे भरत होते. गाड्या उचलण्यासाठी ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ दिली जात असल्याचे ठाण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते अजय जेया यांनी पोलीस आयुक्त तसेच वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर टोईंग व्येवस्था बंद करण्यात आली होती, परंतु पुन्हा एकदा ही व्यवस्था सुरु करण्यात आली. कोणत्याही प्रकारची निविदा न काढता 2022च्या निविदा प्रक्रियेची कागदपत्रे बनवून तसेच त्याच ठेकेदाराबरोबर करार केल्याचे श्री. जेया यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्यास हरकत घेताच वाहतूक पोलिसांना सुरु केलेली टोईंग व्यवस्था पुन्हा एकदा बंद करण्याची नामुष्की वाहतूक पोलिसांवर आली आहे.
याबाबत श्री. जेया यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि कोणत्याही प्रकारची निविदा न काढता टोईंगचा ठेका देण्यासाठी आमचा विरोध आहे. मुंबईप्रमाणे ठाणे पोलिसांनी नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांच्या विरोधात कारवाई करावी. ज्या अधिकाऱ्याने बेकायदेशीरपणे टोईंग ठेकेदाराबरोबर करार केला आहे, त्याची चौकशी करून त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी अन्यथा न्यायालयात धाव घेऊन दाद मागणार असे देखिल त्यांनी जाहीर केले आहे.
पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे हे प्रामाणिक अधिकारी आहेत, परंतु वाहने उचलणाऱ्या ठेकेदाराबरोबर बेकायदेशीर करार करून काही वरिष्ठ अधिकारी पोलीस आयुक्त श्री.डुंबरे यांना अडचणीत आणत असून अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी श्री.जेया यांनी केली आहे.