बोगस परवानग्यांच्या मदतीने घर-गाळे विक्री करणार बिल्डर फरार

* अटकपूर्व जामीन रद्द, पोलीस ओस्तवालच्या शोधात

भाईंदर: भाईंदर पूर्वेला बोगस शिक्के, स्वाक्षऱ्या आणि मंजुरी प्रमाणपत्रे तयार करून जेसलपार्क परिसरात सात मजली टोलेजंग व आलिशान इमारती बांधणाऱ्या विकासकाचा अटकपूर्व जामीन अर्ज रद्द करण्यात आला आहे. दरम्यान विकासक फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

भाईंदर पूर्वेला जेसलपार्क परिसरात मुख्य रस्त्यावर बनावट नकाशे तयार करून ‘ओसवाल ऑरनेट’ च्या मूळ बांधकाम नकाशात बदल करून शासकीय अधिकाऱ्यांच्या सह्या आणि शिक्के मारून ४४० च्या आसपास फ्लॅट व गाळे विक्री करणाऱ्या बिल्डर उमराव सिंग ओस्तवाल विरोधात नवघर पोलिस ठाण्यात २० मे २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. महानगरपालिका परिसरात ओस्तवाल बिल्डर यांनी शहरात अनधिकृत बांधकामाची बजबजपुरी करून ठेवलेली असताना सुद्धा प्रशासनाकडून नेहमी उमराव ओस्तवाल यांची पाठराखण केली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. ह्यापूर्वी अनेक ठिकाणी वाढीव मंजुरीपेक्षा जास्त बांधकाम करण्याचे अनेक गुन्हे व दावे न्यायालयात दाखल केलेले आहेत.
विकासकाने ‘बोगस नकाशा’ बनवून त्याच्या आधारे फ्लॅट विक्री केल्याप्रकरणी ‘उमराव सिंह ओस्तवाल बिल्डर’ वर नवघर पोलीस ठाण्यात २० मे २०२१ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाईंदर पूर्वेच्या जेसलपार्क परिसरात असलेल्या ‘ओस्तवाल ऑरनेट’ ह्या इमारतीच्या बांधकामाच्या बाबतीत बिल्डर उमराव सिंग ओसवाल विरोधात शिजाॅय मॅथ्यू यांनी मीरा भाईंदर पालिका आयुक्त व पोलिसांकडे लेखी तक्रारी पुराव्यानिशी दाखल केलेल्या होत्या त्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.

फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने उमराव सिंह ओस्तवाल बिल्डर यांनी २८ मे २०२१ रोजी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता. २४ जून २०२१ रोजी अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळला आहे. त्यानंतर पोलिसांना आरोपी सापडला नाही. मुंबई उच्च न्यायालयाकडून तात्पुरते अटकपूर्व जामीन देण्यात आले होते. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी अटकपूर्व जामीन रद्द करून फेटाळला व त्याचे आदेश १४ फेब्रुवारी रोजी न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांनी पारित केले. त्यामध्ये सुनावणीची बाजू सरकारी वकील संगीत शिंदे यांनी मांडली तर तक्रारदार व सामाजिक कार्यकर्ते शिजॉय मॅथ्यू यांच्या वतीने वकील मृत्यूझा नझमी, शंभू झा व कन्हाई बिश्वास यांनी बाजू मांडून युक्तिवाद करीत आरोपी यांचे अटकपूर्व जामीन फेटाळण्याची मागणी केली.आरोपीचे वकील वरिष्ठ अधिष्ठाता ॲड. शिरीष गुप्ते व वकील ब्रिजेश पाठक हे होते. तर आरोपीला पकडण्यासाठी आम्ही कारवाई करीत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली आहे.