दोन्ही दादांच्या संमतीने ठरणार बाजार समिती सभापती ठरणार?

नवी मुंबई: न्यायालयाच्या आदेशाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी सोमवार, २४ फेब्रुवारीला निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र सभापती पदासाठी मोठी रस्सीखेच सुरू असून राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार व वने मंत्री गणेश नाईक यांच्या संमतीने सभापती नेमणूक होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

राज्यातील सर्व बाजार समितींची शिखर बाजार समिती असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे दोन वर्षांपासून सभापती आणि उपसभापती पद रिक्त असल्याने बाजार समितीमधील अनेक महत्त्वाचे निर्णय रखडले आहेत. त्यामुळे या दोन्ही महत्त्वाच्या पदांसाठी निवडणुका घ्याव्यात, अशी
मागणी संचालक जयदत्त होळकर यांनी उच्च न्यायालयात केली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने बाजार समितीला या दोन्ही पदांसाठी निवडणूक घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. न्यायालयाच्या आदेशानुसार सभापती व उपसभापती निवडणूक २४ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता मुंबई एपीएमसी येथील प्रशासकीय इमारतीत पार पडणार आहे.

आजवर बाजार समितीवर राष्ट्रवादीतर्फे शरद पवार यांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र आता राष्ट्रवादीचे दोन गट पडले असून अजित पवार सत्तेत उप मुख्यमंत्री असल्याने बहुतेक संचालक पुन्हा अजित पवार गटाकडे झुकले आहेत. तर स्थानिक नेतृत्व म्हणून गणेश नाईक यांची देखील बाजार समितीवर चांगली पकड आहे. दोन-तीन संचालक हे शिंदे समर्थक आहेत. आजवर ज्यांची राज्यात सत्ता असेल त्यांचे संचालक जास्त असतील तर सभापती पद त्यांना दिले जायचे. २०२० ला राष्ट्रवादीचे व आता अजित पवार समर्थक अशोक डक यांना सभापतीपद देण्यात आले होते. २०२२ मध्ये डक यांनी राजीनामा दिल्याने सभापती पद रिक्त असून ते काळजी वाहू सभापती म्हणून काम पाहत आहेत. आता २४ फेब्रुवारीला होणाऱ्या सभापती पदासाठी अशोक डक यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र असे असले तरी राज्यात आता भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी असे महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे सभापती निवडण्यासासाठी तिन्ही पक्षांचे एक मत होणे आवश्यक आहे. यात उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समोर दिसत नसले तरी प्रभु पाटील यांच्यासाठी उप सभापतीसाठी सूत्रे हलवित असल्याची चर्चा आहे. तर सभापती पदासाठी भाजपची देखील मर्जी राखावी लागणार असल्याने
राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार व वने मंत्री गणेश नाईक यांच्या संमतीने सभापती ठरवला जाणार आहे. त्यासाठी आज नवी मुंबईत संचालकांसोबत एक गुप्त बैठक पार पडणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

सभापतीपदासाठी अशोक डक, सुधीर कोठारी, जयदत्त होळकर, बाळासाहेब सोळसकर यांची नावे तर उपसभापतीपदासाठी धनंजय वाडकर, प्रभू पाटील आणि प्रवीण देशमुख यांच्य्या नावांची चर्चा आहे.

सभापती अशोक डक आणि उपसभापती धनंजय वाडकर यांनी २०२२ मध्ये आपल्या पदांचे राजीनामे दिले होते. त्यानंतर ही २३ पैकी १५ संचालकांचा त्यांच्या बाजार समितीचा कार्यकाळ संपल्याने इथले संचालक पद सोडावे लागलें होते. या संचालकांना त्यावेळी अपात्र ठरवले होते. अपात्रतेमुळे संचालक मंडळाचा २३ सदस्यांची गणपूर्ती होत नसल्याने निवडणूक घेता येत नव्हती. मात्र आत्ता हे संचालक पात्र ठरल्याने, ही निवडणूक लावली जात आहे. बाजार समितीच्या २३ पैकी २१ संचालकांना यावेळी आपले मत देता येणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणातर्फे मुंबई बाजार समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.