भिवंडीमध्ये अल्पवयीन मुलांच्या अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ

* दोन दिवसांत तीन अल्पवयीन मुले बेपत्ता
* २०२४ मध्ये २२७ तर २०२३ मध्ये १७२ गुन्हे दाखल

भिवंडी: भिवंडीत अल्पवयीन मुलांच्या अपहरणाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांत तीन अल्पवयीन मुलांच्या अपहरणाच्या घटना घडल्याने शहरात खळबळ माजली आहे.

शांतीनगर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी तीन मुलांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान याबाबत आढावा घेतला असता २०२४ मध्ये अल्पवयीन मुलांच्या अपहरणाचे २२७ आणि २०२३ मध्ये १७२ अल्पवयीन मुलांच्या अपहरणाचे गुन्हे दाखल झाले होते. वाढत्या घटनांमुळे पालकांची चिंता वाढली आहे.

शांतीनगर पोलिसांनि दिलेल्या माहितीनुसार, निजामिया हॉटेलजवळील स्थानिक आझाद नगर, गायत्री नगर येथील रहिवासी सुशील कुमार निषाद (३५) यांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात त्यांची पाच वर्षांची मुलगी दृष्टी निषाद हिचे अज्ञात व्यक्तीने तिच्या घरातून अपहरण केले आहे, अशी तक्रार दाखल केली आहे.

त्याचप्रमाणे भिवंडी ग्रामीण भागातील विठ्ठल मंदिराजवळील भरतशेठ यांच्या किराणा दुकानाजवळ कैलास तारेच्या खोलीत राहणाऱ्या सरोज जयस्वाल (३४) हिने पोलिसांना सांगितले की, तिचा मुलगा आयांश जयस्वाल (२.५ वर्षे) हा घराबाहेर खेळण्यासाठी गेला होता. एका अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केले आहे. त्याचप्रमाणे शांतीनगर परिसरातील एका शाळेजवळ राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेने शांतीनगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ती या पोलिस ठाण्याच्या हद्दीत तिच्या पती आणि मुलांसह राहते. १२ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता तिची १५ वर्षांची मुलगी कोणालाही न सांगता घराबाहेर पडली. अज्ञात आरोपीने तिच्या अज्ञानाचा फायदा घेत तिला आमिष दाखवून अपहरण केले आहे. अशाप्रकारे तीन मुलांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिसांनी अज्ञात अपहरणकर्त्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि मुलांचा शोध सुरू केला आहे.

२०२४ मध्ये भिवंडी शहरात अपहरणाचे २२८ गुन्हे दाखल झाले. त्यामध्ये २२७ अल्पवयीन मुलांचा समावेश होता. यापैकी १६१ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत, तर इतरांचा शोध सुरू आहे.

२०२३ मध्ये शहरात अपहरणाचे १७२ गुन्हे दाखल झाले. त्यामध्ये १०० अल्पवयीन मुली आणि ६६ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. त्यापैकी ६५ मुले आणि ८६ अल्पवयीन मुली सापडल्या आहेत. तर १४ मुली अजूनही बेपत्ता आहेत.