संगीतभूषण पं. राम मराठे संगीत महोत्सवाची सांगता

* तिसऱ्या दिवशी ‘संगीत बावनखणी’चा हाऊसफुल्ल प्रयोग
* शौनक अभिषेकींचे गायन, विश्वमोहन भट्ट यांचे मोहन वीणावादन

ठाणे : संगीतभूषण पं. राम मराठे संगीत महोत्सवाच्या २९व्या वर्षाचा कळसाध्याय पं. विश्वमोहन भट्ट आणि सलील भट्ट यांच्या मोहन वीणा वादनाने तसेच, पं. शौनक अभिषेकी यांच्या गायनाने लिहिला गेला. त्याचबरोबर, अखेरच्या दिवशी झालेल्या ‘संगीत बावनखणी’ या नाटकाच्या प्रयोगास रसिकांची हाऊसफुल्ल उपस्थिती होती.

ठाणे महानगरपालिका आयोजित संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहाचे यंदाचे २९ वे वर्ष होते. डॉ. काशिनाथ घाणेकर नाटयगृह येथे तीन दिवस हा महोत्सव रंगला.

रविवारी, महोत्सवाच्या सांगतेच्या दिवशी लेखक विद्याधर गोखले यांच्या समर्थ लेखणीमुळे अजरामर झालेले आणि य़शवंत देव यांच्या संगीताने नटलेले ‘संगीत बावनखणी’ हे दोन अंकी नाटक सादर झाले. त्याची रंगावृत्ती, नेपथ्य संकल्पना आणि दिग्दर्शन श्रीकांत दादरकर यांचे होते. संगीत मार्गदर्शन ज्ञानेश पेंढारकर, नृत्य मागदर्शन स्मृती तळपदे यांचे होते. तर, निर्मिती प्रमुख म्हणून शुभदा दादरकर यांनी जबाबदारी सांभाळली. गौतम कामत, मैत्रेयी नायक, अभिजीत कासेखेडीकर, प्राची जोशी-फर्नांडिस, प्रसाद केळकर, हेमंत किरकिरे, प्रतीक फणसे, विधी मोरे, चंद्रकांत जोशी, तन्वी गोरे आणि धवल भागवत या कलाकारांनी या भूमिका साकारल्या. रसिकांची सर्वाधिक उपस्थिती या प्रयोगास लाभली.

दुसऱ्या सत्रात, पं. शौनक अभिषेकी यांच्या स्वरांत रसिक न्हाऊन निघाले. त्यांना हार्मोनियम साथ अनंत जोशी यांनी तर, तबला साथ तेजोवृष जोशी यांनी केली. तर, महोत्सवाची सांगता पं. विश्वमोहन भट्ट आणि सलील भट्ट यांच्या मोहन वीणा वादनाने झाली. त्यांना तबला साथ पं. मुकुंदराज देव यांनी केली.

या महोत्सवात कलाकारांचे स्वागत अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे आणि उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी यांनी केले. तर संपूर्ण महोत्सवाचे प्रवाही सूत्रसंचालन निवेदक राजेंद्र पाटणकर यांनी केले. महोत्सवातील ध्वनी यंत्रणेची जबाबदारी भगवान भोईर यांच्यावर होती. तर नाटकाची ध्वनिव्यवस्था अलंकार देसाई यांनी सांभाळली.