भारताने एक दिवसीय मालिका जिंकली

अहमदाबाद: भारताने इंग्लंडला तिसऱ्या वनडे मालिकेत १४२ धावांनी पराभूत करत दणदणीत विजय मिळवला आहे. यासह भारताने या वनडे मालिकेत इंग्लंडवर निर्भेळ मालिका विजय नोंदवला.

भारताने प्रथम फलंदाजी करताना ३५६ धावांची मोठी धावसंख्या उभारली. शुबमन गिलने शतक झळकावत शानदार कामगिरी केली तर भारताच्या टॉप फलंदाजांनी मोठ्या धावसंख्येचं योगदान दिलं आहे. इंग्लंडचा संघ प्रत्युत्तरात २१४ धावा करत सर्वबाद झाला.

भारतीय संघ नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. रोहित शर्माच्या रूपात भारताला सुरूवातीलाच धक्का बसला. पण भारताचा रनमशीन विराट कोहलीने शुबमन गिलबरोबर संघाचा डाव उचलून धरला. टीम इंडियाच्या विजयाचा हिरो शुभमन गिल होता, ज्याने आपल्या वनडे कारकिर्दीतील ७वे शतक झळकावले. गिलने १४ चौकार आणि ३ षटकारांसह ११२ धावा केल्या. गिलशिवाय श्रेयस अय्यरने ७८ धावांची खेळी केली, तर विराट कोहलीनेही ५२ धावांची खेळी केली. विराट कोहलीने ४५१ दिवसांनंतर वनडे क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावले.

भारताच्या सर्व गोलंदाजांना विकेट घेण्यात यश मिळालं. यात अर्शदीप सिंग, हर्षित राणा, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ विकेट घेतले. वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

इंग्लंडच्या पराभवाचे मुख्य कारण त्याचे फलंदाज ठरले. फिल सॉल्ट, बेन डकेट, टॉम बँटन, जो रूट, हॅरी ब्रूक या तिघांनी चांगली सुरुवात केली पण कोणीही मोठी खेळी करू शकले नाही. टॉप ऑर्डरच्या पाच फलंदाजांमध्ये बँटनने सर्वाधिक धावा केल्या, त्याने ३८ धावांची शानदार खेळी केली. डकेटने ३४, सॉल्टने २३, रूटने २४ धावा केल्या. हॅरी ब्रूकच्या बॅटमधून १९ धावा आल्या. कर्णधार बटलरला केवळ ६ धावा करता आल्या तर लिव्हिंगस्टनने २३ चेंडूत केवळ ९ धावा केल्या.