पोलीस अंमलदार रेखा शिंदे यांना महाराष्ट्र श्री किताब

ठाणे: ठाणे पोलीस आयुक्तालयातील मुंब्रा पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार रेखा शिंदे यांनी पुण्यात झालेल्या चुरशीच्या शरीर सौष्ठव स्पर्धेत ‘महाराष्ट्र श्री’ हा महत्वाचा मानला जाणारा किताब पटकावला.

थेऊर, पुणे येथे ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डींग असोसिएशन, मुंबई यांनी ५ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या महिला शरीर सौष्ठव स्पर्धेत रेखा शिंदे यांनी ही कामगिरी केल्याने ठाणे पोलिसांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

महिला अंमलदार रेखा शिंदे यांनी यापूर्वीही महाराष्ट्र पोलीस गेम २०२३ मध्ये पुणे येथे झालेल्या स्पर्धेत ५०-५५ वजनी गटामध्ये सुवर्णपदक व चॅम्पियनशिप मिळविली होती. सन २०२३ मध्ये हरियाणा येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये देखील सुवर्णपदक व चषक पटकावला होता. सन २०२४ मध्ये लखनऊ येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस गेम रेसलिंग क्लस्टर या स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक प्राप्त केले असून महाराष्ट्र पोलीस गेम-२०२४ नाशिक येथे झालेल्या स्पर्धेत देखील त्यांनी सुवर्णपदक प्राप्त केलेले आहे.