लोकलमध्ये मोबाईलचा स्फोट

ठाणे: कल्याण धीम्या लोकलमध्ये सोमवारी रात्री एका प्रवासी महिलेच्या मोबाईलला अचानक आग लागल्याने गोंधळ उडाला. रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांनी ही आग आटोक्यात आणल्यानंतर ही लोकल कल्याणच्या दिशेने रवाना करण्यात आली. या घटनेमुळे काही काळ महिला प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती.

सोमवारी सायंकाळी सीएसएमटी (मुंबई)हून कल्याणच्या दिशेने धीमी लोकल जात होती. रात्री ८ वाजून ११ मिनिटांनी लोकल कळवा रेल्वे स्थानकात आली असता, एका महिलेच्या बॅगेमध्ये ठेवलेल्या मोबाईलमधून अचानक धूर येऊन आग लागली. या घटनेनंतर महिलांच्या डब्यातील प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. महिला आरडाओरड करत घाबरून पळू लागल्या. गोंधळाची माहिती मोटरमन श्रवण कुमार यांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ त्यांच्याकडील अग्निरोधक यंत्रणेच्या साहाय्याने आग विझवली. घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर कळवा स्थानकातील पोलीस कर्मचारी त्याठिकाणी गेले. त्यांनी गर्दी नियंत्रणात आणली. सुमारे १५ मिनीटे लोकल कळवा स्थानकात थांबविण्यात आली होती. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर ही लोकल कल्याणच्या दिशेने रवाना झाली. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद करून तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक अर्चना दुसाने यांनी दिली.