कर्जबाजारी भाऊ-बहिणीची विष प्राशन करून आत्महत्या

वसई: कर्जबाजारी झालेल्या भाऊ बहिणीचे मृतदेह राहत्या घरात आढळल्याची घटना वसई येथे उघडकीस आली आहे. १५ दिवसांपूर्वी त्यांनी विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केली. बंद घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने रहिवाशांनी पोलिसांना कळविले. दरवाजा बनावट चावीने उघडल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

हनुमंता प्रसाद (40) आणि यमुना प्रसाद (45) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, हनुमंता प्रसाद आणि यमुना प्रसाद हे वसईच्या एव्हरशाईन सिटी येथील मंगल वंदन सोसायटीत राहतात. दोघेही कर्जबाजारी झाले होते. त्यांच्यावर 25 लाखांचे कर्ज होते. तसेच ऑफीसमधील काही लोक आणि मोठ्या भावाकडून ते उसने पैसे मागत होते.

यानंतर दोघा बहीण भावांनी राहत्या घरात बेडरुममध्ये विषारी द्रव्य पिऊन आपली जीवनयात्रा संपवली. गेल्या १५ दिवसांपासून घराचे दार न उघडल्याने तसेच घरातून दुर्गंधी येत असल्याने घरमालकाने सोमवारी दुपारी 112 नंबरवर कॉल करुन पोलिसांना बोलावून घेतले. यावेळी पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीच्या सहाय्याने घरात प्रवेश केल्यानंतर दोघा बहिण भावांचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आले. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. सध्या आचोळे पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.