नवी मुंबई: नवी मुंबईतील तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंडला मंगळवार दुपारी साडेबारात वाजण्याच्या सुमारा आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
तुर्भे येथे नवी मुंबई महानगर पालिकेचे डंपिंग ग्राउंड असून या ठिकाणी शहरातील कचरा तसेच हरित कचरा आणला जातो. मात्र मंगळवार ११ फेब्रुवारी रोजी या ठिकाणी भीषण आग लागली.
दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत डंपिंग ग्राउंडच्या सुरक्षा व्यवस्थापनाने वाशी अग्निशमन केंद्राला ही माहिती देताच अग्निशमन दल दाखल झाले. तोपर्यंत आसपास धुराचे लोट उडाल्याने परिसरात धुराचे साम्राज्य झाले होते. डंपिंग ग्राउंडला आग लागल्याने या ठिकाणी उग्र दर्प सर्वत्र पसरला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दुपारी तीनच्या आसपास आगीवर नियंत्रण मिळवले मात्र आग धुमसत असल्याने कुलिंगचे काम उशिरापर्यंत सुरू होते, अशी माहिती वाशी अग्निशमन केंद्रप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी दिली.