सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी कठोर कायदा करा

खासदार नरेश म्हस्के यांची संसदेत मागणी

नवी दिल्ली: सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या अश्लिलतेचा कहर सुरु आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली रोज नविन बेताल वक्तव्य केली जात आहेत. आता या माध्यमांना लगाम लावण्यासाठी कठोर कायदा करावा, अशी मागणी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत शून्य प्रहर दरम्यान केली.

युट्यूबवरील एका कार्यक्रमात यूट्युबर रणवीर अलाहाबादिया याने आई आणि वडिलांसंदर्भात अतिशय अश्लाघ्य भाषेत संवाद साधला आहे. यामुळे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत संताप व्यक्त करत तत्काळ अलाहाबादियावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तसेच त्याच्यावर बंदी आणण्याची सूचना केली. भारतीयांनीही अलाहाबादियाला अनफॉलो करावे, असे आवाहन नरेश म्हस्के यांनी केले आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या या मागणीला सर्वपक्षीय खासदारांनी पाठिंबा दर्शविला.

प्रसिद्धीच्या नवनवीन माध्यमांमध्ये आघाडीवर असलेल्या सोशल मीडियामध्ये अनेक लोक आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कंटेंटमुळे प्रसिद्ध होत आहेत. लोक त्यांच्यावर प्रेम करतात आणि त्यांना उदंड प्रतिसाद मिळतो. म्हणून मनास येईल ते बोलण्याची त्यांना मुभा नाही. आपल्या देशाची संस्कृती, इतिहास, परंपरा आणि जीवन पद्धती विसरून चालणार नाही. कोणत्याही पॉडकास्टरला त्याचे विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असलं तरीही स्वत:च्या मर्यादा त्याने स्वत:च घालून घ्याव्यात, अन्यथा लोकांच्या मोठ्या रोषाला त्याला सामोरे जावे लागू शकते, हे आता प्रत्येक सोशल मीडिया ‘वीरा ‘ने लक्षात घेतले पाहिजे अन्यथा `रण’ माजू शकते, असा इशारा नरेश म्हस्के यांनी दिला आहे. अश्लील, अश्लाघ्य बोलून सवंग प्रसिद्धी मिळेलही परंतु लोकांच्या मनातून मात्र तुम्ही कायमचे पायउतार व्हाल हे लक्षात घ्या, अशी तंबीही खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.

सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉमवर सध्या अतिशय विचलित करणारे चित्रीकरण होत आहे. पोर्न मजकूर सोशल मिडीया आणि ओटीटी प्लॅटफॉमवर सर्रास दाखवले जात आहेत. शिवराळ भाषा आणि चिथावणीखोर मजकूर, धार्मिक भावनांचा अनादर अशी उदाहरणे या मंचावर वाढत चालली आहेत. बदलत्या तंत्रज्ञानानुसार सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी सेन्सॉर आवश्यक असून कठोर कायदाही करायला हवा, असे मत खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहात व्यक्त केले.