१२५ जणांवर गुन्हे दाखल
ठाणे: गेल्या ११ महिन्यांत ठाणे शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या १२५जणांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून आठ हजारांहून अधिक बॅनर हटविण्याची कारवाई पालिकेने केली आहे. बॅनरबाजांकडून एक लाखाहून अधिक रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
ठाणे महापालिका हद्दीतील चौक, मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावर, टीएमटी बस थांबा, उड्डाणपुल या ठिकाणी बेकायदा बॅनर-होर्डिंग लावून शहर विद्रुप केले जात आहे. त्यांच्याविरोधात महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
दोन वर्षांपुर्वी सुशोभिकरणाचे प्रकल्प ठाणे महापालिकेने राबविले होते. त्यावर करोडो रुपयांचा खर्च करण्यात आला होता. यामध्ये शहरातील रस्त्यांलगतच्या भिंतींवर रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. शहरातील चौकांचेही सुशोभिकरण करण्यात आलेले आहे. तलावांचे परिसरही सुशोभित करण्यात येत आहेते. यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडली असतानाच, बेकायदा बॅनरबाजीमुळे शहराचे विद्रुपीकरण होताना दिसून येत आहे.
गेल्या काही वर्षांपासून नेत्यांची पदनियुक्ती, वाढदिवसानिमित्त बेकायदा बॅनरबाजी करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. काही जण पालिकेने परवानगी दिलेल्या होर्डींगवर अधिकृतपणे बॅनर लावत आहेत. तर, काही जण पालिकेच्या परवानगीविनाच महामार्ग, रस्त्याच्या दुतर्फा, अंतर्गत रस्ते आणि चौकात बेकायदा बॅनरबाजी करत आहे. या बेकायदा बॅनरबाजीमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून असे बॅनर हटविण्याची कारवाई पालिकेकडून सातत्याने करण्यात येत आहे. यामध्ये ठाणे पालिका क्षेत्रातील एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ अशा ११ महिन्यांच्या कालावधीत ८१७४ बेकायदा फलक, पोस्टर आणि होर्डींग हटविण्याची कारवाई पालिकेने केली आहे. बेकायदा बॅनरबाजी केल्याप्रकरणी १२५ जणांवर गुन्हे दाखल केले असून एक लाख १०५० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त (अतिक्रमण) शंकर पाटोळे यांनी दिला आहे.
कारवाईची आकडेवारी
प्रभाग हटवलेले फलक गुन्हे दंड वसूल
नौपाडा-कोपरी ७०५ २१ १००५०
वागळे इस्टेट १२१६ २ १०७००
लोकमान्य/सावरकर नगर ९९५ १६ १००५०
वर्तकनगर १३१९ ८ १०७००
माजिवडा-मानपाडा ७४५ ९ १५४००
उथळसर ४७५ ३ १०८००
कळवा १०७१ २८ १०८००
मुंब्रा ६९७ २७ १२०५०
दिवा ९५१ ११ १०५००
एकूण ८१७४ १२५ १,०१,०५०