उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा
ठाणे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे कॉमनमॅन म्हणून जनतेसाठी दिवसरात्र कार्यरत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील कॉमनमॅनचा गौरव करून हा दिवस “कॉमनमॅन दिन’ म्हणून साजरा करण्याचा अनोखा उपक्रम युवा सेनेच्यावतीने आज राबवण्यात आला. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले.
ठाण्यातील उपवन अॅम्फी थिएटर येथे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि माजी नगरसेविका परिषा सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यातील ६१ सामान्य नागरिकांचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये पोस्टमन, भाजीवाले, पोलीस कर्मचारी, रिक्षाचालक, महिला रिक्षाचालक, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी,पंडित, वारकरी,डिलेव्हरी बॉय, हमाल अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींना गौरवण्यात आले.
युवासेनेच्या या अनोख्या उपक्रमाने सामान्य माणसाचे योगदान आणि त्यांच्याशी असलेली नाळ अधिक दृढ केली. या कार्यक्रमातून शिवसेनेचे सामाजिक बांधिलकीचे वचन अधोरेखित झाले.
हा उपक्रम म्हणजे सामान्य माणसाबद्दलचा कृतज्ञतेचा भाव आणि त्यांच्या योगदानाबद्दलचा आदर असल्याच्या भावना युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे आयोजन युवासेनेच्या वतीने अत्यंत भव्यदिव्य पद्धतीने करण्यात आले होते, उपस्थित नागरिकांनी या अनोख्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. युवासेनेने राबवलेला ‘कॉमनमॅन दिन’ एक सामाजिक संदेश देणारा उपक्रम ठरला.
यावेळी युवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे, युवासेना सचिव किरण साळी यांच्यासह युवा सेनेचे इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.