सबनीस यांना पी. सावळाराम तर भागवत यांना गंगा-जमुना पुरस्कार

निकिता भागवत, अरुंधती भालेराव आणि दत्तात्रय मोरे यांनाही पुरस्कार

ठाणे: ठाणे महानगरपालिका व जनकवी पी. सावळाराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा ‘जनकवी पी.सावळाराम स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना, तर ‘गंगा-जमुना पुरस्कार’ अभिनेत्री लीना भागवत यांना जाहीर झाला आहे.

रविवार, २३ फेब्रुवारी, २०२५ रोजी दुपारी ४.३० वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे प. येथे पुरस्कार वितरण सोहळा आणि पी. सावळाराम यांच्या गीतांवर आधारित कार्यक्रम होणार आहे.

या पुरस्कार सोहळ्यास रसिकांना विनामूल्य प्रवेश असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

ठाणे महानगरपालिका व जनकवी पी. सावळाराम कलासमिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संगीत’, ‘अभिनय’, ‘शिक्षण’, ‘साहित्य’ अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कलावंतांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. तसेच नवोदित कलावंताना प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘उदयोन्मुख कलावंत’ हा पुरस्कार देखील यावेळी दिला जाणार आहे.

सन २०२४चा ‘जनकवी पी. सावळाराम पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना देण्यात येणार असून रु. ७५ हजार रुपये सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. तर, गंगा-जमुना पुरस्कार’ अभिनेत्री लीना भागवत यांना देण्यात येणार असून त्याचे स्वरुप ५१ हजार रुपये, सन्मानचिन्ह असे आहे. त्याचबरोबर, साहित्य क्षेत्रातील पुरस्कार लेखिका निकिता भागवत, शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार अरुंधती भालेराव व उदयोन्मुख कलावंत हा पुरस्कार दत्तात्रय तथा दत्तू मोरे यांना देण्यात येणार आहे. प्रत्येकी २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह असे या तिन्ही पुरस्काराचे स्वरूप आहे.

या कार्यक्रमास जनकवी पी. सावळाराम यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. तसेच रसिकांसाठी जनकवी पी. सावळाराम यांच्या गाण्यांचा ‘सावध हरिणी सावध ग!’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रंगाई निर्मित या कार्यक्रमात अमृता दहिवेलकर, सुराज सोमण, केतकी भावे-जोशी हे गायक कलाकार सहभागी होतील. संगीत संयोजन विनय चेऊलकर यांचे तर निर्मिती प्रमुख दिगंबर प्रभू आहेत. निवेदन दिपाली केळकर करणार आहेत. रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामुल्य खुला असून त्यास मोठ्या संख्येने उपस्थिित रहावे, असे आवाहन ठाणे महापालिका व जनकवी पी. सावळाराम कला समिती यांच्यावतीने करण्यात आले आहे.

या सोहळ्यास येणाऱ्या रसिकांसाठी रविवार, २३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता राम गणेश गडकरी रंगायतन ते डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह तसेच, रात्री ८ वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ते राम गणेश गडकरी रंगायतन या प्रवासासाठी ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेमार्फत सशुल्क बस व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार आहे.