ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या वतीने बोरिवडे मैदान, कासारवडवली येथे आरक्षणे व सुविधा भूखंड विकसित करण्याच्या कार्यक्रमांतर्गत बांधण्यात येत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे क्रीडा संकुलाचे भूमिपूजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते रविवारी दुपारी करण्यात आले.
घोडबंदर रोड प्रभाग क्र. १ मधील आरक्षणे व सुविधा भूखंड विकसित करण्याकरता ‘महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांचा विकास’ या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून ७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून बोरीवडे मैदान विकसित करून धर्मवीर आनंद दिघे क्रीडा संकुल बांधण्यात येत आहे. या क्रीडा संकुलाचा फायदा या परिसरातील सर्व नागरिकांना खेळाडूंना होणार आहे. त्यामुळे हा एक महत्त्वाचा प्रकल्प ठरणार असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याप्रसंगी केले.
या भूमिपूजन सोहळ्यास माजी नगरसेविका साधना जोशी, माजी नगरसेवक पूर्वेेश सरनाईक, कार्यकारी अभियंता संजय कदम, उपअभियंता बी. व्ही. गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यास परिसरातील नागरिक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बोरिवडे मैदान आरक्षित भूखंडाचे क्षेत्रफळ ८४९७४ चौरस मीटर असून त्यापैकी ६८१९ चौरस मीटर क्षेत्रफळावर जिमखाना बांधण्यात येणार आहे. या जिमखान्यामध्ये विविध प्रकारच्या खेळांसाठी सुविधा असणार आहेत. त्यात, बॅडमिंटन कोर्ट, क्रिकेट प्रॅक्टिस नेट, कुस्ती, उपहारगृह आदी सुविधा असतील. तर, मल्लखांब, कबड्डी, हुतुतू, लाल मातीची कुस्ती, बास्केटबॉल कोर्ट , व्हॉलीबॉल कोर्ट, स्केटिंग ट्रॅक या मैदानी खेळांचाही समावेश आहे. तसेच, मैदानाचे पूर्णपणे सपाटीकरण करणे, संरक्षक भिंत आणि आकर्षक प्रवेशद्वार या कामांचाही प्रकल्पात समावेश आहे.