प्रथम तीन विजेत्यांना प्रत्येकी १० हजारांचे बक्षीस
ठाणे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त `क्रेडाई-एमसीएचआय ठाणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेतील तीन गटांमधील प्रत्येकी पाच विजेत्यांना रोख बक्षीस व कला साहित्य देऊन गौरविण्यात आले.
`क्रेडाई-एमसीएचआय’चे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा घेण्यात आली. `क्रेडाई-एमसीएचआय’च्या वतीने ठाणे येथील हायलॅण्ड गार्डन येथील भव्य मैदानात सुरू असलेल्या प्रदर्शनाच्या आज तिसऱ्या दिवशी घर खरेदीसाठी इच्छूक नागरिक व कुटुंबांबरोबरच मोठ्या संख्येने शाळकरी मुलांचीही गर्दी झाली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या स्पर्धेत पहिल्या गटातील विजेत्या तीन विद्यार्थ्यांना नऊ हजार रुपये रोख व कला साहित्य, दुसऱ्या गटातील तीन विजेत्यांना सात हजार रुपये रोख व कला साहित्य आणि तृतीय गटातील तीन विजेत्यांना चार हजार रुपये व कला साहित्य देऊन गौरविण्यात आले. प्रत्येक गटातील दोन विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. तर सहभागी विद्यार्थ्यांना कला साहित्याचे गिफ्ट देण्यात आले. महेश आंजर्लेकर आर्ट ॲडव्हायजरी व तृप्ती शिरसी यांच्यावतीने स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते.