‘कॉपीमुक्त परीक्षा’ पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सन २०२४- २०२५ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा २१ फेब्रुवारी २०२५ व बारावी बोर्ड परीक्षा ११ फेब्रुवारी, २०२५ रोजी सुरू होणार आहे. जिल्हा प्रशासनामार्फत ‘कॉपीमुक्त परीक्षा’ पार पाडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

विद्यार्थ्यांनी या परीक्षेस सामोरे जाताना कॉपीमुक्त परीक्षा व भयमुक्त परिक्षेस सामोरे जावे, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव तथा पालक सचिव, ठाणे जिल्हा सुजाता सौनिक व दक्षता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

जिल्ह्यात दहावीकरिता ३३८ परीक्षा केंद्र असून एक लाख ३,७१८ तर बारावी परीक्षा करिता १९७ परीक्षा केंद्र असून एक लाख २१,२४४ विद्यार्थ्यी परिक्षेस प्रविष्ठ होत आहेत. परीक्षा कामकाज २० परिरक्षक केंद्रामार्फत होणार आहे.

शिक्षण विभागाच्या अंतर्गत भरारी पथक व आवश्यकतेप्रमाणे बैठे पथक नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच तालुका व मनपा स्तरावरून स्वतंत्रपणे भरारी व बैठे पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल विभागांतर्गत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत भरारी पथके नेमण्यात आली आहे. या व्यतिरिक्त जिल्हा स्तरावरील खाते प्रमुख यांनी परीक्षा केंद्राना भेटी देण्यासंदर्भांत नियोजन करण्यात आले आहे.

परिक्षादरम्यान कॉपी अथवा इतर गैरप्रकार निदर्शनास आल्यास अशा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे तरी विद्यार्थी व पालकांनी दक्षता घ्यावी तसेच परीक्षा केंद्रावर गैरप्रकार निदर्शनास आल्यास परीक्षा केंद्र कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल अशा सूचना प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या आहेत.

परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक व पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांचे डिजिटल माध्यमातून फेसियल उपस्थिती घेण्यात येणार आहे.