* उद्यानासाठी घरखरेदी करणाऱ्यांच्या पदरी निराशा
* निर्णयाविरोधात रहिवासी जाणार न्यायालयात
आनंद कांबळे/ठाणे
रहिवाशांचा तीव्र विरोध डावलून राज्य सरकारने रेमंड येथिल उद्यानाचे आरक्षण बदलल्याने रेमंड येथिल रहिवाशी प्रचंड संतापले आहेत. आरक्षण बदलण्याच्या या निर्णयाविरोधात ते न्यायालयात धाव घेणार आहेत. एकूणच ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाच्या नवीन इमारतीचे काम वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे
रेमंड येथिल महापालिकेच्या ३.५ हेक्टर क्षेत्रावर सुविधा भूखंडावर मुख्यालयासाठी ३२ मजल्यांची इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे ७८५ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन झाले होते. हे मुख्यालय प्रथम महापालिकेच्या सुविधा भूखंडावर रेमंड डेव्हलपरने ही इमारत स्वखर्चाने बांधून देणे अपेक्षित होते, परंतु सुविधा भूखंडाऐवजी उद्यानाकरिता आरक्षित असलेल्या भूखंडावर या मुख्यालयाची इमारत बांधण्याचा घाट महापालिकेने घातला असून त्याला या भागातील नागरिकांनी तीव्र विरोध केला होता.
उद्यान असल्याचे पाहून अनेकांनी घर खरेदी केले होते, परंतु ते उद्यानच होणार नसल्याने रेमंड येथिल नागरिकांनी महापालिका भवनाच्या इमारतीच्या बांधकामाला विरोध सुरु केला आहे.
या भागात असलेल्या उद्यानाचे आरक्षण 3 ऑक्टोबर २०२४ रोजी बदलण्यात आले असून त्यावर उप सचिव निर्मलकुमार चौधरी यांची सही आहे. या अध्यादेशाबाबत येथिल नागरिकांना अंधारात ठेवण्यात आले असल्याचा आरोपी येथिल नागरिक करत असून महापालिकेचे अधिकारी देखिल आरक्षण बदल केल्याचा अध्यादेश उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप करत आहेत.
आरक्षण ३७ (१) नुसार हे आरक्षण बदली करण्यात आले होते. ते नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देणे आवश्यक होते, परंतु ते उपलब्ध करून दिले नाही, असा देखिल आरोप केला जात आहे. हे आरक्षण बदली करण्यात आल्यामुळे मुख्यालय इमारतीच्या कामातील अडथळा दूर झाला असून महापालिकेने या उद्यानाच्या जागेतील हजारो झाडे तोडून तसेच पुनररोपण करण्याचा देखिल निर्धार केला आहे. महापालिकेच्या या निर्णयाविरोधात या भागातील नागरिक न्यायालयात धाव घेणार आहेत, त्यामुळे मुख्यालय इमारतीचे भवितव्य काय असेल ते भविष्यात स्पष्ट होणार आहे.
या बाबत महापालिकेच्या शहर विकास विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
आरक्षण बदलाच्या अध्यादेशामध्ये ०.३७ पडीक जमिन दाखवली असून ती जमिन नैसर्गिक नाला बुजवून तयार केली असल्याचे एका नागरिकांने सांगितले.