ठाणे शहरातील सर्व पोस्ट कार्यालये सक्षम करणार

आमदार संजय केळकर यांनी पोस्ट विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची घेतली बैठक

ठाणे: लाखो सर्वसामान्य नागरिकांशी नाळ कायम ठेवणाऱ्या ठाणे शहरातील काही पोस्ट कार्यालयांची दुरावस्था असून काही कार्यालये हद्दीबाहेर असल्याने नागरिकांची ससेहोलपट होत आहे. तर काही कार्यालयांमध्ये पुरेशा सुविधा नाहीत. याबाबत त्रस्त नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेत आमदार संजय केळकर यांनी नुकतीच पोस्ट विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत अनेक सूचना केल्या. तसेच शासन प्रशासनाच्या मदतीबरोबरच आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

ठाणे शहरातील सर्व पोस्ट कार्यालये सक्षमपणे कार्यरत होण्यासाठी, नवीन पोस्ट कार्यालये निर्माण करण्यासाठी आणि स्थलांतरीत झालेली कार्यालये पुन्हा मूळ जागी आणण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी संबंधित नागरिक आणि पोस्ट विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची नुकतीच बैठक घेतली.

सॅण्डोज बाग पोस्ट कार्यालयाचे नामकरण कोलशेत पोस्ट कार्यालय करण्याबाबत श्री.केळकर यांनी अधिकाऱ्यांना सूचना केली आहे. पूर्वीचे सॅण्डोज हे नावच आता अस्तित्वात नसल्याने पोस्टाची जागा कोलशेत भागात असल्याने त्याचे नामकरण करण्याबाबत त्यांनी आग्रह धरला. पूर्वीच्या जे.के. ग्राम पोस्ट कार्यालयासाठी जी जागा उपलब्ध केली आहे ती तळघरात असल्याने ती बदलून पालिकेकडे नवीन जागेसाठी पाठपुरावा करणार असल्याचे श्री केळकर यांनी सांगितले.

नौपाडा भागातील पोस्ट कार्यालय हे दम्माणी इस्टेट येथे गेली ५० वर्षे होते. इमारतीच्या पुनर्विकासानंतर विकासकाने त्याच जागेत कार्यालयासाठी जागा देण्याबाबत यावेळी बैठकीत चर्चा करण्यात आली.

वागळे इस्टेट येथे सध्या पोस्ट ऑफिसच नसून पूर्वीचे १९८४ पासून असलेल्या पोस्ट ऑफिस ठाणे स्टेशनजवळील कार्यालयातून कार्यरत असल्याने नागरिकांना गैरसोईचे होते. त्यामुळे हे कार्यालय वागळे इस्टेट येथे पुन्हा स्थलांतरीत करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याची माहिती श्री.केळकर यांनी दिली.

पोस्ट कार्यालयाची उपयुक्तता गरीब, मध्यमवर्गीयांना मोठ्या प्रमाणात असते.संपूर्ण शहरात आज याबाबत दुरावस्था असून नागरिकांनी त्रस्त होऊन निवेदने दिली होती. पुढील काळात सर्व पोस्ट कार्यालये सक्षम होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले.