दोन अंतराळयानांना डॉकिंग करणारा भारत चौथा देश

श्रीहरिकोटा: अंतराळात दोन अंतराळयानांना यशस्वीरित्या डॉक करणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. याआधी केवळ रशिया, अमेरिका आणि चीनलाच हे यश मिळाले आहे. इस्रोने अंतराळात डॉकिंग यशस्वी झाल्याचे म्हटले आहे. आज 16 जानेवारीला ही मोहीम फत्ते झाल्याने चांद्रयान-4, गगनयान आणि भारतीय अंतराळ स्थानकासारख्या मोहिमांना शंभर हत्तींचे बळ मिळाले आहे.

चांद्रयान-4 मोहिमेत चंद्राच्या मातीचे नमुने पृथ्वीवर आणले जातील. गगनयान मोहिमेत मानवाला अवकाशात पाठवले जाणार आहे. इस्रोने 30 डिसेंबर 2024 रोजी रात्री 10 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून अंतराळ डॉकिंग प्रयोग मोहीम प्रक्षेपित केली होती. या अंतर्गत पीएसएलव्ही-सी ६० रॉकेटच्या सहाय्याने पृथ्वीपासून ४७०किमीवर दोन अंतराळ यान तैनात करण्यात आले.

7 जानेवारी रोजी या मोहिमेत दोन्ही अंतराळयान जोडले जाणार होते, परंतु ते पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर 9 जानेवारीलाही तांत्रिक अडचणींमुळे डॉकिंग पुढे ढकलण्यात आले. 12 जानेवारी रोजी अंतराळयानांना तीन मीटरजवळ आणल्यानंतर त्यांना पुन्हा सुरक्षित अंतरावर नेण्यात आले.

अंतराळयानामधील अंतर 15 मीटरवरून तीन मीटरपर्यंत खाली आणले गेले. डॉकिंग अचूकतेने सुरू करण्यात आले, परिणामी अंतराळयान यशस्वीपणे कॅप्चर करण्यात आले. डॉकिंग यशस्वीरित्या पूर्ण झाले. स्पेस डॉकिंग यशस्वी करणारा भारत हा चौथा देश ठरला. डॉकिंगनंतर, दोन अंतराळ यानांवर एकच वस्तू म्हणून नियंत्रण ठेवण्यात यश आले. अनडॉकिंग आणि पॉवर ट्रान्सफर चेक येत्या काही दिवसांत घेण्यात येतील.

जगाला डॉकिंग आणि अनडॉकिंग तंत्रज्ञान दाखवणे, हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट होते. पृथ्वीच्या कक्षेत दोन लहान अंतराळयानांचे डॉकिंग आणि अनडॉकिंग तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यासाठी तसेच दोन डॉक केलेल्या स्पेसक्राफ्टमध्ये इलेक्ट्रिक पॉवर हस्तांतरित करण्याच्या तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यासाठी या प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले.

भारताला डॉकिंग यंत्रणेचे पेटंट
या डॉकिंग यंत्रणेला ‘इंडियन डॉकिंग सिस्टम’ असे नाव देण्यात आले आहे. इस्रोने या डॉकिंग प्रणालीचे पेटंटही घेतले आहे. कोणतीही अंतराळ संस्था या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रक्रियेचे तपशील शेअर करत नसल्यामुळे भारताला स्वतःची डॉकिंग यंत्रणा विकसित करावी लागली.