सीपी तलाव परिसरात पुन्हा कचऱ्याचे ढीग

ठाणे: तांत्रिक कारणांमुळे डायघर कचरा प्रकल्प एक महिन्यापासून बंद असल्याने ठाण्यातून एकही कचऱ्याची गाडी डायघर प्रकल्पाकडे गेलेली नाही. परिणामी एक महिन्यापासून संपूर्ण ठाणे शहराचा कचरा हा सीपी तलाव परिसरातच पडून आहे. सीपी तलाव परिसराच्या बाहेर काचऱ्याच्या गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज एक हजार मॅट्रिक टन कचरा निर्माण होत असून या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी डायघर परिसरात कचरा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी अजूनही पूर्ण क्षमतेने कचऱ्यावर प्रक्रिया केली जात नाही. तर जेव्हापासून प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे तेव्हापासून काही ना काही तांत्रिक कारणांमुळे हा प्रकल्प बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर येत असते. काही महिन्यांपूर्वीच कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा प्रकल्प काही दिवस बंद ठेवावा लागला होता. आता पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या महिनाभरापासून डायघर प्रकल्पाची क्षमता कमी झाल्याने सर्व कचरा हा पुन्हा सीपी टॅंक परिसरातच साचवला जात आहे. परिणामी या परिसरात अक्षरशः कचऱ्याचे ढीग साचले आहेत.

डायघर प्रकल्प सध्या बंद असल्याने ठाणे शहर, कोपरी, वागळे तसेच खाडीच्या पलिकडे असलेले कळवा, मुंब्रा आणि दिवा असा संपूर्ण ठाणे शहराचाच कचरा आता या ठिकाणी आणून टाकला जात आहे. दररोज १५० पेक्षा अधिक कचऱ्याच्या गाड्या या ठिकाणी खाली होत आहेत. मात्र कचरा टाकण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने सीपी टॅंक परिसराच्या बाहेर अक्षरशः गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. तर तर एका गाडीचा नंबर येण्यासाठी चार ते पाच तासांचा कालावधी लागत असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.

स्मार्ट सिटी म्हणून गाजावाजा होत असलेल्या ठाणे शहराच्या कचर्‍याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. विशेषत: वागळे इस्टेट भागात असलेल्या सीपी टँक भागात कचर्‍याचे ढीग साचू लागल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. सीपी कचरा संकलन केंद्र बंद करू, असे आश्वासन पालिका प्रशासनाने सहा महिन्यांपूर्वी दिले होते. मात्र हे आश्वासन कचर्‍यातच गेले असून सीपी टँक संकलन केंद्र बंद करण्यात पालिका प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले असल्याची टीका स्थानिक नागरिकांनी केली आहे.

तांत्रिक कारणांमुळे डायघर प्रकल्पाची क्षमता काही प्रमाणात कमी झाली आहे. येत्या चार दिवसांत पुन्हा एकदा कामकाज सुरळीत होणार आहे, अशी माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली.