फिट जेईई इंजिनिअरींग क्लासेसच्या संचालकांवर गुन्हा दाखल
ठाणे: आयआयटी आणि जेईईची शिकवणी देण्याच्या नावाखाली विद्यार्थ्याची सव्वातीन कोटींची फसवणुक करीत शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य बिघडवण्याची धमकी देणाऱ्या खाजगी शिकवणीच्या आठ संचालकांविरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिट जेईई इंजिनिअरींग क्लासेस असे त्या खाजगी शिकवणीचे नाव असून फसवणुकीनंतर शिकवणीला टाळे ठोकून भामटे पसार झाले आहेत. ठाण्यातील जांभळी नाका बाजारपेठेतील प्रभात प्लाझा इमारतीत दुसऱ्या मजल्यावर फिट जेईई इंजिनिअरींग क्लासेस सुरू करण्यात आले होते. २०१३ पासून या संस्थेमध्ये अकरावी – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकीच्या पूर्व तयारीची (आयआयटी आणि जेईई) शिकवणी दिली जात होती. या संस्थेत एप्रिल २०२४ वर्षात २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. अकरावी आणि बारावी असे दोन वर्षांसाठी या संस्थेने बँकेतील आपल्या विविध चालु खात्यांमध्ये शुल्क स्विकारले होते. संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांची प्रवेश परिक्षा घेऊन, ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळतील त्यांना शुल्कामध्ये सवलत दिली होती. २५ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांचे वर्ग सुरळीत सुरु होते. त्यानंतर, या संस्थेची पुण्यात असलेली शाखा काही तांत्रिक कारणामुळे बंद करण्यात आली. कालांतराने ठाण्यातील शाखेला घरघर लागली. पालकांनी जाब विचारताच संस्था चालकांनी पाच हजार भरल्यास दिल्लीतील संस्थेतून ऑनलाईन शिकवणीचा पर्याय देण्यात आला. मात्र, फसवणुक झाल्याने पालकांनी या पर्यायाला नकार देत ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार, शिकवणीच्या दिल्ली शाखेचा मुख्य संचालक डि. के. गोयल,राजीव बब्बर, मनिष आनंद यांच्यासह ठाणे शाखेच्या अनुज राठोड, विकास शर्मा, शरद शुक्ला, प्रशांत भगत आणि मुंबई शाखेचे मोहित सालढाणा या आठ जणां विरोधात ३ कोटी २० लाखांची फसवणुक केल्याचा तसेच विद्यार्थ्याचे भविष्य बिघडवण्याची धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला आहे.