‘ठाणेवैभव’ची बातमी अन् कारवाईचा गिअर

ठाणे: नियमापेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात अखेर प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा गियर टाकला असून आज अनेक रिक्षांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आल्याने रिक्षा चालकांचे धाबे दणाणले.

‘ठाणेवैभव’ने रविवारी रिक्षाचालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन रिक्षा सुसाट चालवत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठाणे स्टेशन, अल्मेडा चौक, खोपट, नौपाडा या भागात ज्यादा प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षांच्या विरोधात कारवाई केली. त्यामध्ये सुमारे ३० ते ४० रिक्षा चालक सापडले. त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई दुपारी एकच पथक करत असल्याने त्या पथकाची पाठ फिरताच पुन्हा रिक्षा चालकांनी चार ते पाच प्रवासी भाडे घेण्यास सुरुवात केली होती. ही कारवाई सतत सुरु ठेऊन ज्यादा प्रवासी घेणाऱ्या रिक्षा चालकांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी केली जात आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील यांनी याबाबत लक्ष घालून रिक्षा चालकांच्या विरोधात ही मोहीम तीव्र करावी, अशी मागणी ठाणेकरांकडून केली जात आहे.