* विहिगाव खोडाळ राज्य मार्गावर अपघात
* एकाचा मृत्यू, आठ जखमी
* धरणात जाता-जाता गाडी बचावली
शहापूर : कसाऱ्याजवळील विहिगाव खोडाळा मार्गावरील अप्पर वैतरणा धरणावरील पुलाच्या आधी एक प्रवासी जीप 200 फूट खाली दरीत गेल्याने आठ जण जखमी झाले. त्यातील एक वृद्ध व्यक्ती उपचारादरम्यान मृत्यु पावली तर जखमींपैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी खर्डी येथे पाठवण्यात आले आहे.
आज सकाळी कसाऱ्याजवळील माळ येथील झुगरे कुटुंबीय एका खासगी वाहनातून माळ या गावातून खोडाळा येथे घरगुती कामासाठी निघाले असता विहिगाव सोडल्यानंतर एका वळणावर वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन चालकाने गाडी डाव्या बाजूकडील एका दरीच्या दिशेने फिरवली. अंदाज न आल्याने जीप खोल दरीत कोसळली. पलटी मारत गाडी खाली असलेल्या धरण पात्राच्या पाण्याजवळील एका खडकावर जाऊन अडकली. या भीषण अपघातात आठ ते नऊ जण जखमी झाले असून जखमींना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या दरम्यान जखमींपैकी दादू झुगरे (65) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर अन्य जखमींवर कसारा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी पल्लवी आखाडे यांनी प्रथोमचार करून पुढील उपचारासाठी खर्डी, इगतपुरी येथे पाठवण्यात आले.
सन्या झुगरे (60), भारती झुगरे (18), सुरेश ठोंबरे (30), उषा झुगरे, (30), अती झुगरे (38), अंकिता झुगरे (16), आदित्य झुगरे (8), पातळी झुगरे (45) अशी जखमींची नावे आहेत. यापैकी दोन जणांना जास्त दुखापत झाली आहे.