सहा वर्षीय रेयांशकडून १५ किमी सागरी अंतर तीन तासांत पार!

* ठाण्याचा रेयांश ठरला सर्वात लहान जलतरणपटू
* इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली दखल

ठाणे: ठाण्यातील सहा वर्षांचा जलतरणपटू रेयांश खामकर याने विजयदुर्ग येथील अरबी समुद्रात मालपे जेट्टी ते वाघोटन जेट्टी हे १५ किलोमीटरचे आव्हानात्मक सागरी अंतर तीन तासात पोहून पार केले आहे. ही कामगिरी करणारा रेयांश हा सर्वात लहान जलतरणपटू ठरला असून त्याची दखल इंडिया बुक रेकॉर्डने घेतली आहे.

सांस्कृतिक कार्य तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲङ आशिष शेलार, ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष ॲड. निरंजन डावखरे, महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष राजेश मोरे यांनी देखील रेयांशचे अभिनंदन करुन त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

रेयांश खामकर हा स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या माध्यमातून जलतरणाचे धडे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्याकडून घेत असून तो ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे दररोज सराव करीत आहे. रेयांश हा ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असून त्याच्या या विक्रमाबद्दल त्याचे शाळेनेही कौतुक केले आहे. गेल्या वर्षभरात विविधस्पर्धांमध्ये रेयांशने १३ पदके प्राप्त केली असून यात पाच सुवर्ण, पाच रौप्य आणि तीन कांस्य पदकांचा समावेश आहे.

विजयदुर्ग येथील सागरी जलतरण ही रेयांशची पहिलीच सागरी जलतरण स्पर्धा होती. या स्पर्धेत सहभागी होणारा हा लहान जलतरणपटू असल्याने सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचली होती. परंतु हे अंतर अवघ्या तीन तासांत पार करुन रेयांशने एक विक्रम केला. त्याने केलेल्या या कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून रेयांशला प्रमाणपत्र देऊन त्याचा सन्मान केला आहे.

सन २०२४ मध्ये रेयांश खामकर हा सतत विविध स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग घेत होता. २ जून २०२४ रोजी ठाणे येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २५ मीटर बटरफ्लाय विथ फिन्स स्पर्धेत त्याने सुवर्णपदक तर ५० मीटर फ्रीस्टाईल विथ फिन्समध्ये कांस्य पदक प्राप्त केले. ६ जुलै २०२४ रोजी कोल्हापूर येथे झालेल्या महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या त्रिराज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत त्याने ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले. १७ ते १८ ऑगस्ट २०२४ रोजी बँकॉक, थायलंड येथे झालेल्या आशियाई ओपन स्कूल्स स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये रेयांशने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तो महाराष्ट्र एक्वाटिक असोसिएशनने निवडलेल्या 15 जलतरणपटूंपैकी एक होता, ज्याने आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. सहा वर्षांखालील मुलांच्या गटात २५ मीटर फ्रीस्टाइल किकबोर्डमध्ये रौप्य पदक, २५ मीटर फ्री स्टाईलमध्ये कांस्य पदक, ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये कांस्य पदक, २०० मीटर फ्री स्टाईल रिलेमध्ये रौप्य पदक त्याने प्राप्त केले.

१५ सप्टेंबर २०२४ रोजी अंडरवॉटर स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रद्वारा आयोजित केलेल्या चौथ्या महाराष्ट्र राज्य फिन स्विमिंग स्पर्धेत रेयांशने ५० मीटर मोनोफिन सरफेस स्विमिंगमध्ये सुवर्णपदक, १०० मीटर बायफिन मिश्र रिलेमध्ये सुवर्णपदक, ५० मीटर बायफिन स्विमिंगमध्ये रौप्यपदक पटकाविले. ही स्पर्धा आठ वर्षे व त्यावरील वयोगटासाठी होती, परंतु रेयांशने आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत केलेली कामगिरी लक्षात घेऊन नऊ वर्षे या वरिष्ठ वयोगटात सहभागी होण्यासाठी त्याला विशेष प्रवेश देण्यात आला होता, ज्यामध्ये त्याने नऊ वर्षांखालील जलतरणपटूंशी स्पर्धा केली. ९ ऑक्टोबर २०२४ रोजी विबग्योर हायस्कूल खारघर येथे झालेल्या १६व्या व्हिवा इंटरस्कूल जलतरण स्पर्धेत रेयांशने २० मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्णपदक आणि २० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य पदक प्राप्त केले आहे. सर्वात लहान रेयांश खामकर या ठाणेकर जलतरणपटूचे सर्वत्र कौतुक होत असून ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त मीनल पालांडे, तरण तलाव व्यवस्थापक रिमा देवरुखकर, उपव्यवस्थापक रवी काळे यांनी देखील त्याचे कौतुक करुन त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.