दिव्यात कारवाई दरम्यान सहायक आयुक्तांवर हल्ला

अनधिकृत गाळेधारक पिता-पुत्र ताब्यात

ठाणे : कल्याण फाटा येथे अनधिकृत गाळ्यांच्या विरोधात कारवाई करताना दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तावर बाप-लेकाने हल्ला केल्याची घटना काल दुपारी घडली असून हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे हे काल दुपारी कल्याण फाटा येथे अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या गाळ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी त्यांच्या कर्मचारी आणि पोलिस ताफ्यासह गेले होते. दुपारी अडीचच्या दरम्यान अनधिकृत गाळा बांधणाऱ्या बाप-लेकाने सहाय्यक आयुक्त श्री. घुगे यांच्याशी पहिल्यांदा वाद घातला. पोलिसांनी त्यांना बाजुला केल्यानंतर त्या दोघांनी त्याच्यावर पाठीमागून डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला, परंतु श्री. घुगे यांनी प्रसंगावधान राखल्याने त्यांना किरकोळ मार लागला. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात शीळ-डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शीळ-डायघर पोलिस करत आहेत.

कळवा, मुंब्रा, दिवा आणि शीळ या भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. दिवा, शीळ या भागातील फेरीवाले आणि अनधिकृत बांधकाम यांच्या विरोधात सहाय्यक आयुक्त श्री.घुगे यांनी मोहीम उघडली आहे. त्यांनी कारवाई करू नये याकरिता हा हल्ला करण्यात आला असला तरी कारवाई सुरूच राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

याबाबत श्री.घुगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि या ठिकाणी अनधिकृत गाळ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली होती. अनधिकृत बांधकाम तोडण्याची प्रक्रिया पूर्ण करून ही कारवाई करण्यात येत होती. पोलीस बंदोबस्त देखिल घेण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले.

माजिवडे-मानपाडा आणि दिवा भागात बांधकामांचा सुळसुळाट

सध्या शहरात विशेषतः माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती हद्दीत सर्रासपणे अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. याबाबत तक्रारी आल्यानंतर त्यावर तत्काळ कारवाया होत नाहीत. परिणामी बांधकामे पूर्ण झाल्यानंतर त्यावर कारवाई करण्यास पथक गेले की हल्ल्याचे प्रकार होतात. त्यामुळे संबंधित सहायक आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच तक्रारींची दखल घेण्याची मागणी होत आहे.