सिव्हील रुग्णालयात २० वर्ष जुन्या संधिवातावर रुग्णाला मिळाला गुण!
ठाणे: संधिवातामुळे शरीराच्या हालचाली कमी होऊन, काम करतेवेळी शारीरिक वेदना होतात. काही वेळा दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागत असते. ॲलोपॅथिक उपचार केल्यावर देखील फारसा फायदा न झालेल्या रुग्णांसाठी ठाणे सिव्हील रुग्णालय आयुष विभागातील युनानी औषधी उपचार कापिंग थेरेपी गुणकारी ठरताना दिसत आहे.
गेल्या २० ते २५ वर्षांपासून सांधेदुखीचा त्रास असलेल्या रुग्णाला युनानीची मात्रा चांगलीच लागू पडल्याने रुग्णाला मोठा दिलासा मिळाला आहे.
ठाण्यात रहाणारे सदाशिव मोरे (नाव बदलून) या ५६ वर्षांच्या गृहस्थांना २० ते २५ वर्षांपासून सांधेदुखीचा त्रास होता. सकाळी उठताना, चालताना, पाण्याचा नळ उघडताना आदी कामानिमित्त शरीराची हालचाल करताना वेदना व्हायच्या. या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक उपचार केले. मात्र उपचार निरर्थक झाले होते. या आजारातून कसा बरा होईन याचा विचार सुरू असताना ठाणे सिव्हील रुग्णालयातील आयुष विभागात चांगले उपचार होतात अशी माहिती सदाशिव यांना समजली. त्यानुसार युनानी औषधी उपचार कपिंग थेरपीच्या माध्यमातून संधिवातावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदाशिव यांच्या संधिवातावर यशस्वी उपचार केले असल्याची माहिती युनानी तज्ज्ञ डॉ. झुबेर अन्सारी यांनी दिली.
सदाशिव हे गेल्या काही महिन्यांपासून आयुष विभागात उपचारासाठी येत असून, त्यांच्या संपूर्ण शरीराची मसाज, कपिंग थेरपी, औषध आदीच्या माध्यमातून उपचार सुरू आहेत. त्यांना युनानी कपिंग थेरपीचा फायदा होत असल्याचे सदाशिव म्हणाले. शरीराची हालचाल चांगली होत असून वेदना देखील कमी झाल्या आहेत. ते आता स्वतःहून उठतात. अर्धा तास मॉर्निंग वॉक, लिहिणे, धावणे, दोरीउड्या आदी हालचाली करत आहेत. तसा अभिप्राय देखील लिहीला आहे. सदाशिव यांच्यावर चांगले उपचार करण्यासाठी युनानी तज्ज्ञ डॉ. झुबेर अन्सारी, डॉ. लुकमान खान, मसाजिष्ट धनाजी कांबळे यांनी अथक परिश्रम घेतले आहेत.
रुग्णालयाच्या आयुष विभागातील आयुर्वेदिक, होमियोपॅथी, युनानी आदी विभाग चांगले काम करत आहेत. ॲलोपॅथिक प्रमाणेच आता आयुष उपचार करण्यासाठी रुग्णांचा विश्वास वाढतो आहे. यापैकी युनानी औषधी उपचार कपिंग थेरपी ही आखाती देशातील जुनी उपचार पद्धती आहे. यामध्ये कपिंग, मसाज आणि औषध आदीच्या माध्यमातून उपचार होतात. या उपचारांनी अनेक दुखणी बरी होताना दिसतात, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.