ठाणे : मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज कामत आणि पोलीस शिपाई सचिन उदमले यांच्यावर ठाणे विभागाच्या लाच लुचपत विरोधी पथकाने लाचेची रक्कम मागणी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक मनोज कामत आणि पोलीस शिपाई सचिन उदमले हे मुरबाड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. या प्रकरणातील तक्रारदार यांच्या भाच्याच्याविरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात एका महिलेने तक्रार दिलेली आहे. त्याच्यावर कोणतीही कारवाई न करता तक्रारी अर्ज निकाली काढून मदत करण्यासाठी यातील लोकसेवक निरीक्षक मनोज कामत यांनी लोकसेवक पोलीस शिपाई सचिन उदमले यांना तक्रारदार यांच्याकडे लाचेची रक्कम मागण्यासाठी प्रवृत्त केले.
त्यामुळे लोकसेवक सचिन उदमले यांनी त्यांचे वरिष्ठ अधिकारी पोलीस निरीक्षक मनोज कामत यांच्या सांगण्यावरून पोलीस निरीक्षक कामत यांच्यासाठी आणि स्वत:साठी तक्रारदार यांच्याकडे दोन लाख रुपये लाचेची मागणी केली व संबंधित लाचेची रक्कम लोकसेवक पोलीस शिपाई सचिन उदमले यांनी स्वीकारण्याची तयारी दर्शवली म्हणून आरोपी लोकसेवक मनोज कामत निरीक्षक आणि शिपाई सचिन उदमले यांच्याविरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.