नेरूळमध्ये स्थिरावला रशियाचा बायलॉन्स क्रेक

ठाणे: नोव्हेंबर महिन्यात कडाक्याच्या थंडीची चाहूल लागताच, उत्तरेकडील पक्षी दक्षिण भागाकडे झेपावताना दिसतात. यापैकी युरोप आणि रशिया येथून आलेला बायलॉन्स क्रेक हा पक्षी नेरूळ येथील ‘ट्रेनिंग शीप चाणक्य’च्या गवताळ ब्बा दिसल्याची माहिती पक्षी अभ्यासक वीरेंद्र घरत यांनी दिली.

हवामानातील वाढत्या बदलामुळे अनेक स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन उशिराने झाले आहे. यात युरेशिया येथून आलेल्या ‘बायलॉन्स क्रेक’ (लावी फटाकडी) या पक्ष्याचा समावेश आहे. नवी मुंबई नेरूळ परिसरातील गवताळ भागात वावरणा-या या पक्ष्याला पाहण्याची संधी पक्षी मित्रांना खुणावत आहे.

बायलॉन्स क्रेक हा भारतासह श्रीलंका, बांगलादेश, अंदमान बेटे आदी दक्षिण आशियायी देशात वास्तव्याला असतो. हा १६ ते १८ सेमी लांबीचा असतो आणि छोट्या कोंबडीच्या आकाराचा असतो. जिथे पाणथळ गवताळ भाग आहे, तेथे त्यांचे वास्तव्य असते. हा पक्षी काहीसा भित्रा असून गवतातून फारच कमी वेळा बाहेर येतो आणि त्याचे खाणे चिखलातील किटक व छोटे मासे आहे.

‘बायलॉन्स’ची चोच आखूड, सरळ व पिवळी किंवा हिरवी असते. पूर्ण वाढ झालेल्या पक्षांची पाठ तपकिरी असून त्यावर पांढरे ठिपके असतात. पंखाखाली व शेपटीखाली काळे पांढरे पट्टे असतात. शेपटी आखूड असते. पाय हिरवे, पायाची बोटे लांब असल्यामुळे त्याचा उपयोग चिखलातून चालताना होतो. पाणथळ गवतातील सुक्या जागेवर घरटे बनवतो आणि चार ते सहा अंडी घालतो. या पक्ष्यांच्या पाच उपजाती असून त्या-त्या प्रत्येक भागाप्रमाणे त्याचे वैशिष्ट्य वेगळे आहे. ‘लुईस अँटनी फ्रांसवा बायलॉन‘ या फ्रेंच निसर्ग शास्त्रज्ञावरून या पक्ष्याला हे नाव पडले आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे, अशी माहिती ठाणे येथील पक्षी अभ्यासक वीरेंद्र घरत यांनी दिली.