मालमत्ता कर वसुलीसाठी भोंगे वाजू लागले
ठाणे : मागील नऊ महिन्यांत पालिकेच्या तिजोरीत मालमत्ता कराच्या एकूण ८५६ कोटी लक्ष्यापैकी ५६० कोटी रुपये वसुल झाले असून पुढील तीन महिन्यांत ३०० कोटी वसूल करण्याचे आव्हान ठामपापुढे उभे राहिले आहे. त्यामुळे शहरात रिक्षांमधून थकबाकी भरण्याचे आवाहन भोंग्यांद्वारे करण्यात येत असून प्रशासनाने आता मोबाईलवरही संदेश पाठवण्यास सुरुवात केली आहे.
ठाणे पालिकेच्या तिजोरीत मालमत्ता करापोटी दरवर्षी ६०० कोटीहून अधिक रक्कम जमा होते. या आर्थिक वर्षामध्ये हे उद्धीष्ट ८२५ कोटी इतके करण्यात आले आहे. त्यापैकी ५६० कोटी रुपयांचा भरणा करदात्यांनी केला आहे. पण पुढील तीन महिन्यात थकबाकीसह सुमारे ३०० कोटी रुपयांची वसूली करण्याचे आव्हान पालिकेच्या कर विभागाकडे आहे.
कोव्हीड काळापासून पालिकेच्या तिजोरीला लागलेली उतरती कळा अजूनही कायम आहे. शासनाकडून मिळणार्या अनुदानातून पालिका कर्मचार्यांचे वेतन काढताना प्रशासनाची कसरत होत आहे. त्यात तिजोरीत खडखडाट असल्यामुळे अनेक ठेकेदारांची बिलेही थकली आहेत. त्यामुळे अनेक विकासकामे ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. यावर्षी लाडकी बहिणी योजना, त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लागोपाठ लागल्याने संपूर्ण प्रशासन त्यात गुंतले. परिणामी पालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत असलेली कर वसुली काही अंशी थंडावली. पण आता निवडणुका संपल्यानंतर ठाणे महापालिकेने तिजोरीत पडलेला खड्डा भरून काढण्यासाठी कर वसुलीकडे लक्ष केंद्रीत केले आहे.
करवसुलीची मोहिम अधिक वेगवान होण्यासाठी मोबाईलवर संदेश पाठवण्याबरोबरच आता दवंडीही पिटण्यात येत आहे. शहरात रिक्षांमधून भोंग्यांद्वारे करदात्यांना मालमत्ता कर भरण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. पालिका दरवर्षी असा उपक्रम राबवत असल्याचे उपायुक्त जी. जी गोदेपुरे यांनी माहिती दिली. तीन महिन्यात सुमारे ३०० कोटी वसुलीचे टार्गेट असले तरी करदात्यांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे ते पूर्ण होईल असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.
१० दिवसांत २३ कोटींची वसुली
पालिकेच्या मालमत्ता विभागाने कर वसुलीत आघाडी घेतली आहे. २१ डिसेंबरपर्यंत या विभागाने ५३७ कोटी ३५ लाखांची वसुली केली होती. तर त्यापुढील दहा दिवसांमध्ये म्हणजे ३० डिसेंबरपर्यंत ही रक्कम ५६० कोटींच्या घरात गेली आहे. विशेष म्हणजे सरत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला तीन कोटी ७२ लाख इतकी वसुली झाली असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली.