वाया गेलेला खर्च अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याची मागणी
ठाणे : ठाणे शहरातील नाले आणि कचऱ्याची व्हिलेवाट कमी मनुष्यबळाने आणि जलदगतीने होण्यासाठी तीन वर्षांपूर्वी विकत घेतलेला रोबोट सध्या धुळखात पडला आहे तर महापालिकेचे घनकचरा विभाग हेच काम करण्यासाठी भाड्याने गाड्या घेत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ठाणे महापालिका हद्दीत दर दिवशी किमान एक हजार टन कचऱ्याची निर्मिती होते. हा कचरा वागळे येथिल सी. पी. टॅंक भागातील महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर भराव करून नंतर तो कचरा डम्पिंग ग्राउंडवर पाठवला जातो. दरवर्षी महापालिका करोडो रुपये खर्च करून वर्षातून दोन वेळा नालेसफाईची कामे करते. ही सर्व कामे कमी वेळात आणि कमी मनुष्यबळाचा वापर करून रोबोटच्या मदतीने केली जाऊ शकतात, परंतु मागिल अनेक महिने हे यंत्र बाळकूम येथिल अग्निशमन दल येथे धुळखात पडले आहे. त्याची देखभाल देखिल महापालिका करत नसल्याने आणखी काही महिन्यानंतर हे यंत्र निकामी होऊन महापालिकेचे पैसे पाण्यात जाण्याची भीती काही जागरूक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या यंत्राच्या मदतीने कचऱ्याची व्हिलेवाट लावता येऊ शकते, कचरा उचलला जाऊ शकतो तसेच डम्परमध्ये कचरा भरण्याचे काम देखिल हा रोबोट करू शकतो. त्याचबरोबर नालेसफाईची कामे देखिल या रोबोटच्या मदतीने केली तर पावसाळ्यात नालेसफाईवर होणारा खर्च कमी होऊ शकतो. त्यामुळे डबघाईला आलेल्या महापालिकेची आर्थिक बचत देखिल होईल, असे एका ठाणेकर नागरिकाने सांगितले.
ठाणे महापालिकेकडे हे यंत्र असतानाही त्याचा वापर न करता लाखो रुपये खर्च करून भाड्याने जेसीबी, पोकलेन घेतले जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पैशाची बचत करण्यासाठी आणि कचरा तसेच नालेसफाई कमी मनुष्यबळाने करण्यासाठी या यंत्राचा वापर करावा, अशी मागणी केली जात आहे.
अधिकाऱ्यांकडून खर्च वसूल करा
महापालिकेची आर्थिक स्थिती भक्कम नसताना अत्यावश्यक बाब म्हणून हा रोबोट लाखो रुपये खर्च करून खरेदी केला आहे. याचा वापर न झाल्याने तो लवकरच निकामी होण्याची शक्यता आहे. सध्या हा रोबोट गंज चढलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीस संबंधित अधिकारी जबाबदार असून त्यांच्याकडूनच या रोबोटचा खर्च वसूल करण्यात यावा, अशी मागणी जागरूक ठाणेकर करत आहेत.