लसणाची फोडणी स्वस्त होणार

घाऊक बाजारात दर ५० रुपयांनी घसरले

नवी मुंबई : मागील काही महिन्यांपासून लसणाच्या दराने उच्चांक गाठला होता. किरकोळ बाजारात प्रतिकिलो ४०० रुपये पार तर घाऊक बाजारात साडेतीनशे ते चारशे रुपयांवर लसणाची विक्री होत होती. परंतु आता लसणाच्या दरात घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी बाजारात प्रतिकिलो पन्नास रुपयांनी दरात घसरण झाली आहे.

आधी चांगल्या प्रतीचा लसूण ३५० रुपयांनी विक्री होत होता. तो आता ३०० रुपयांवर उतरला असून पुढील काळात नवीन लसूण दाखल होताच दर आणखी आवाक्यात येतील, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

एपीएमसी बाजारात लसणाची आवक कमी होत असून दर चढे आहेत. दिवसेंदिवस दरात वाढ होत होती, परंतु आता दरात घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलो लसूण ३५० रुपये तर किरकोळ बाजारात ४०० रुपयांहून अधिक दराने विक्री होत आहे. मात्र आता घाऊक बाजारात १८०-३०० रुपये तर किरकोळ बाजारात दर मात्र चढेच आहेत.

जानेवारी-फेब्रुवारीमध्ये नवीन लसणाची आवक होण्यास सुरुवात होते. सुरुवातीला लसणाचे दर मागील दोन वर्षीच्या तुलनेत आवाक्यात असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत होते. परंतु एप्रिलपासून लसणाच्या दरात सातत्याने वाढ होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून लसणाच्या दरात तेजी आहे.

दोन ते तीन वर्षांपासून लसूण लागवडीखालील क्षेत्र कमी होत असल्याने उत्पादन कमी होत आहे, त्यामुळे लसणाचे दर कडाडले आहेत.

एपीएमसी बाजारात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये नवीन ओला लसूण दाखल होण्यास सुरुवात होत असते. त्यामुळे नवीन लसूण बाजारात दाखल होताच दर आवाक्यात येतील असे मत एपीएमसी घाऊक व्यापारी मेहश राऊत यांनी व्यक्त केले आहे.