उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट

* १५ मिनिटांच्या चर्चेत काय घडले?
* राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा

नागपूर : उद्धव ठाकरे यांनी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोकाचा विरोध केल्यानंतर नागपूरच्या विधीमंडळात त्यांनी फडणवीस यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यात १५ मिनिटे चर्चा झाली. या चर्चेत नक्की काय घडले याबाबत आता राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र ही सदिच्छा भेट असल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना फोन करून निमंत्रण दिले होते. मात्र विरोधकांमधून कुणीही त्यावेळी उपस्थित राहिले नाहीत. यानंतर आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी अनिल परब, आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई आणि सचिन अहिर यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात १० ते १५ मिनिटे चर्चा झाली.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला केवळ ४९ जागा मिळाल्या आहेत. यात शिवसेनेला सर्वाधिक २० जागा जिंकता आल्या आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येपैकी १० टक्के जागा जिंकणे गरजेचे आहे, असा पायंडा आहे. मात्र एकाही पक्षाला २९ जागा जिंकता आलेल्या नाहीत. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील. या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरेंनी भेट घेतल्याचे सांगितले जाते. या भेटीनंतर त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही भेट घेतली.

मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांची भेट झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बातचीत करताना या भेटीबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, “महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील, अशी या सरकारकडून अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त ही निवडणूक कशी जिंकली वगैरे हे प्रश्न आहेतच. त्याबाबत जनतेत जाऊन आवाज उचलत राहू.”